India vs West Indies 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सोमवारी (१ ऑगस्ट) सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र, अचानक या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन बदलांप्रमाणे भारतीय वेळनुसार रात्री दहा वाजता सामना सुरू होईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्याला लॉजिस्टिक समस्यांमुळे विलंब झाला आहे. याबाबत वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने एक निवेदन जारी केले आहे. “क्रिकेट वेस्ट इंडीजच्या (सीडब्ल्यूआय) नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे, त्रिनिदादहून सेंट किट्समध्ये संघाचे महत्त्वपूर्ण सामान येण्यास लक्षणीय विलंब झाला आहे. परिणामी, आजचा दुसरा गोल्डमेडल टी २० चषकातील सामना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे (भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता). चाहते, प्रायोजक, प्रसारण भागीदार आणि इतर सर्व भागधारकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहोत,” असे निवेदन वेस्ट इंडीज क्रिकेटने प्रसिद्ध केले आहे.

त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवलेला आहे. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली आहे. दुसरा आणि तिसरा सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे होणार आहे. तर, फ्लोरिडातील लॉडरहिल येथे चौथा आणि पाचवा सामना खेळवला जाईल.