तडाखेबाज फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

“या मालिकेमध्ये आमच्या संघासाठी एक बाब खूप चांगली आणि सकारात्मक घडली. संपूर्ण मालिकेत आमची फलंदाजी खूप आक्रमक आणि दमदार झाली. आम्ही एक संघ म्हणून खेळलो. २४० धावांचे आव्हान हे नक्कीच पार केले जाऊ शकते, असे आमच्या डोक्यात होते. कारण याच मैदानावर इंग्लंड विरूद्ध आफ्रिका सामन्यात २३० धावांचे आव्हान पार करण्यात आले होते. पण गोलंदाजीमध्ये आम्हाला सुधारणेला खूप वाव आहे”, असे पोलार्डने सांगितले.

संघाबद्दल बोलताना पोलार्ड म्हणाला की आमच्या संघात अनेक उदयोन्मुख प्रतिभावंत खेळाडू आहेत. गोलंदाजी हा आमच्यासाठी काहीसा चर्चेचा विषय आहे, पण त्याची फार काळजी करण्याची गरज नाही. आमच्या कडे भविष्यात आधिक प्रतिभावंत गोलंदाजांचा ताफा असेल अशी मला खात्री आहे. कायम यश मिळणं हे खूप कंटाळवाणं असतं. तुम्हाला त्या एका विशिष्ट दिवशी चांगली कामगिरी करता आली पाहिजे. ते अधिक महत्त्वाचे आहे.

एकदिवसीय मालिकेबाबतदेखील पोलार्डने आपले इरादे स्पष्ट केले. “आम्ही टी २० मालिका २-१ ने गमावली असली, तरी आता तीन एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट मालिका आहे. त्यामुळे या पराभवाचा विचार करत बसणार नसून एकदिवसीय मालिकेवर आम्ही लक्ष केंद्रित करू”, असे तो म्हणाला.

टी २० मालिकेत भारत विजयी

भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा ठोकल्या. सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा पराक्रम केला. विंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. पंतने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत चौकार-षटकार खेचले. हेटमायर ४१, तर पोलार्ड ६८ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर, शमी, चहर आणि कुलदीप यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.