पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

Video : बापरे..!! रोहितने मैदानावरच दिली पोलार्डला शिवी

शिमरॉन हेटमायरने सामन्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने १०६ चेंडूत १३९ धावा केल्या. त्यात त्याने ११ चौकार आणि ७ षटकार ठोकले. या खेळीबाबत सामना संपल्यानंतर सामनावीराचा किताब स्वीकारताना हेटमायर म्हणाला की खरं सांगायचं तर मी प्रत्येक चेंडू पूर्ण ताकदीनिशी मारत होतो. प्रत्येक चेंडू खेळताना चेंडू सीमापार जावा हाच विचार माझ्या मनात होता आणि माझे प्रयत्न यशस्वी झाले. हे शतक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या आधी मी वर्षाच्या सुरूवातीला शतक ठोकले होते. आता मात्र मला कामगिरीत सातत्य राखायचे आहे. मी ठरलेल्या पद्धतीने खेळत राहिलो आणि ठरवलेली योजना अंमलात आणली. गेल्या वेळी मी शतक ठोकले होते, तेव्हा आम्ही पराभूत झालो होतो. त्यामुळे समोर कोणता संघ किंवा कर्णधार आहे याकडे मी लक्ष दिलं नाही. कारण आपला संघ जिंकल्यावर आपल्या चेहऱ्यावर उमलणाऱ्या स्मितहास्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

Video : जाडेजाच्या रन-आऊटवरून वाद; विराट म्हणतो….

हेटमायरच्या झंझावातामुळे भारत पराभूत

भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. राहुल, रोहित, विराट झटपट बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा डाव सावरला. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. हे दोघे माघारी परतल्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत भारताला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. कॉट्रेल, पॉल आणि जोसेफ यांनी २-२ तर पोलार्डने १ बळी टिपला.

भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत त्यांनी अक्षरश: भारताकडून विजय हिसकावून घेतला. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला.