टीम इंडियाने विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २२ धावांनी विजय मिळवला. भारताने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावांपर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर विंडीजला सुधारित आव्हान देण्यात आले होते. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला १२० धावा करणं गरजेचं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजला १५.३ षटकांत ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
३ सामन्यांची हि मालिका आहे. मालिकेतील पहिले २ सामने हे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आले. या दोनही सामन्यात भारताने विंडीजवर विजय मिळवत इतिहास रचला. मात्र मंगळवारी (६ ऑगस्ट) होणारा सामना हा विंडीज बेटांवरील गयाना येथे होणार आहे. त्यासाठी दोनही संघाना लवकरात लवकर तेथे पोहोचावे लागणार आहे. या साठी दोनही संघांनी रविवारी सामना संपल्यानंतर सगळ्या गोष्टी पटापट आवरल्या आणि गयानाला जाण्याच्या दृष्टीने आगेकूच केली. indiancricketteam या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
And that’s a wrap from Florida We now head to Guyana next #TeamIndia #WIvIND
दरम्यान, सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहित-शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. भारतीय सलामीवीरांची फलंदाजी पाहता भारत मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र किमो पॉलने शिखर धवनचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराटच्या साथीने काही काळ डाव सावरला. या दरम्यान रोहितने आपले अर्धशतक साजरे केले. पण अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात थॉमसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. मोक्याच्या क्षणी भारत धावा जमवू शकला नाही. अखेरीस कृणाल पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ चांगली आगेकूच करत होता. पण रोव्हमॅन पॉवेल वगळता कोणालाही फलंदाजीत आपली छाप पाडता आली नाही. त्याने ३४ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला २२ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.