खेळाचे मैदान गाजवल्यानंतर अनेकदा खेळाडू तिरंगा उंचावून आपला आनंद व्यक्त करताना दिसते. मग आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह त्यांच्यात दिसणार नाही, असे होणे अशक्यच आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करताना वैयक्तिक तसेच सांघिक खेळ प्रकारात तिरंग्याची शान वाढवणाऱ्या अनेक खेळाडू स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात रंगल्याचे पाहायला मिळाले. यात वैयक्तिक खेळ प्रकारात मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंपासून ते सांघिक खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय जवानांना खास शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. भारतवासियांना शुभेच्छा देताना त्याने एक देशभक्तीपर गीत गायले आहे. ‘है प्रीत जहॉ की रित..’ असं म्हणत त्याने भारतवासियांसह देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओच्या ट्विटरवर देखील अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या गौतम गंभीरने ‘सारे जहॉ से अच्छा..’ या देशभक्तीपर गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय भारतीय संघाला महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, टेनिस जगतातील लिअँडर पेस, रोहन बोपण्णा, रिओ ऑलिम्पिकमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारी दीपा कर्माकर यांच्यासह अनेक खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.