इशांतचेही भारताच्या कसोटी संघातील स्थान धोक्यात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारतीय संघ जाहीर करण्यात येण्याची शक्यता असून अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपद आणि इशांत शर्माचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.

भारत-आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिल्या कसोटीला प्रारंभ होणार असून त्यानंतर ३ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे दुसरी, तर ११ जानेवारीपासून केप टाऊन येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभय संघांत तीन एकदिवसीय सामनेसुद्धा होतील.

मुंबईकर रहाणेने गेल्या १२ कसोटींमध्ये अर्धशतक झळकावलेले नसून न्यूझीलंडविरुद्धसद्धा तो पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. परंतु कर्णधार विराट कोहलीने रहाणेची पाठराखण केल्यामुळे त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. मात्र त्याच्याऐवजी रोहित शर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पूर्वीप्रमाणे लयीत दिसत नसून मोहम्मद सिराज, आवेश खान, प्रसिध कृष्णा यांसारखे युवा फळीतील गोलंदाज त्याची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत.

मुंबईकर श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात (१०५ आणि ६५) दमदार कामगिरी केल्याने त्याचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. त्याच्यासह मधल्या फळीसाठी हनुमा विहारीला पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.

रबाडा, नॉर्किएचे आफ्रिकेच्या संघात पुनरागमन

जोहान्सबर्ग : भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किए या वेगवान गोलंदाजांच्या जोडीचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. मंगळवारी आफ्रिकेचा २१ जणांचा संघ जाहीर करण्यात आला. वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला आणि यष्टिरक्षक फलंदाज रायन रिकेल्टन या नव्या चेहऱ्यांना आफ्रिकेच्या संघात प्रथमच स्थान देण्यात आले आहे.

’ संघ : डीन एल्गर (कर्णधार), तेम्बा बव्हुमार, क्विंटन डीकॉक, कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, ऱ्हासी व्हॅन डर डुसेन, कायले वेरायन, सॅरेल एव्र्ही, ब्युरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडिन मार्करम, विआन मुल्डर, कीगन पीटरसन, मार्को यान्सन, ग्लेन्टॉन स्टूरमन, प्रेनेलन सुब्रायन, डुआन ओलिव्हर, सिसांडा मगाला, रायन रिकेल्टन.