टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा सामना खूप महत्वाचा ठरणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यात कोणताही संघ हरला तरी स्पर्धेतील त्याचा प्रवास जवळपास संपुष्टात येणार आहे. कारण दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडच्या संघालाही पाकिस्ताने पराभूत केले आहे. उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताली न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे.

टी २० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारताच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला न्यूझीलंडला पराभूत करणं आवश्यक आहे. मात्र त्यासाठी भारतीय संघाला इतिहास रचावा लागणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाला आजपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघ आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत, मात्र दोन्ही वेळा न्यूझीलंडने सामना जिंकला आहे. २००७ च्या टी २० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा १० धावांनी पराभव केला होता. त्यावेळी न्यूझीलंड हा एकमेव संघ होता ज्याने या स्पर्धेत भारताला पराभूत केले होते.

यानंतर २०१६ च्या टी २० विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले होते आणि तेव्ही न्यूझीलंड ने भारताचा ४७ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे टी २० विश्वचषकातील इतिहास पाहिल्यास विल्यमसनच्या संघाचे पारडे जड असल्याचे दिसते आणि विराटला उपांत्य फेरीचे तिकीट हवे असेल तर ३१ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इतिहास बदलावा लागेल.

केवळ टी २० विश्वचषकच नाही तर आयसीसीच्या प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. भारतीय संघाने २००३ मध्ये आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा शेवटचा पराभव केला होता आणि तेव्हापासून न्यूझीलंडने भारताचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न अनेकदा तोडले आहे. २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडने पराभूत केले होते. त्याच वर्षी आयसीसी विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत विल्यमसनने कोहलीचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.