भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत मलेशियाला २-० असे नमवून अपराजित मालिका कायम राखली. या विजयाबरोबर भारताने गटात सात गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. बाद फेरीच्या दिशेने कूच करणाऱ्या भारतीय संघाने ७व्या मिनिटाला पुनम राणीच्या गोलच्या जोरावर आघाडी मिळवून मलेशियावर दडपण निर्माण केले. भारतीय महिलांनी सातत्यपूर्ण खेळ करून सामन्यावर पकड घेतली. ४५व्या मिनिटाला दीपिकाने गोल करत भारताचा २-० असा विजय निश्चित केला.
श्रीजेशकडून शहीद जवानांना विजेतेपद अर्पण
बंगळुरू : आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत आम्ही मिळविलेले हे विजेतेपद उरी येथे अतिरेकी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना अर्पण करीत आहे, असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने सांगितले.
श्रीजेश म्हणाला, या स्पर्धेत पाकिस्तानबरोबर आमचा सामना होणार आहे हे निश्चित होते आणि आम्ही त्यादृष्टीनेच नियोजन केले होते. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला पराभूत करण्याचाच आम्ही चंग बांधला होता. केवळ साखळी लढतीत नव्हे तर अंतिम सामन्यातही त्यांना पुन्हा पराभूत केल्यामुळे आम्ही एकप्रकारे शहीद जवानांना आदरांजलीच अर्पण केली आहे. हे विजेतेपद आमच्या जवानांसाठी व सर्व भारतीयांसाठी दिवाळी भेटच आहे.
‘ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खात्री नाही ’
२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याची खात्री नाही, परंतु संघात स्थान मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने सांगितले. तो म्हणाला, ‘मी खात्रीने सांगू शकत नाही, परंतु संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.’ आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा जिंकल्यानंतर श्रीजेश आणि निक्कीन थिमैया यांचे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी आगमन झाले. या स्पध्रेदरम्यान श्रीजेशच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्याला काही सामन्यांना मुकावे लागले होते.