दक्षिण आफ्रिकेचा ५-१ असा धुव्वा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान ५-१ असे मोडित काढून एफआयएच सीरीज फायनल्स हॉकी स्पर्धेचे विजेतेपद काबीज केले. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने अपेक्षेप्रमाणेच विजेत्याच्या अविर्भावात खेळ केला आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याची किमया साधली.

ड्रॅग-फ्लिकर्स वरुण कुमार (दुसऱ्या आणि ४९व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (११व्या आणि २५व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तर विवेक सागर प्रसादने (३५व्या मि.) एक गोल केला. दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव गोल रिचर्ड पॉट्झने ५३व्या मिनिटाला केला.

शनिवारच्या अंतिम सामन्याअगोदरच भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ ऑलिम्पिक पात्रतेच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. याआधी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जपानने अमेरिकेचा ४-२ असा पाडाव करून तिसरे स्थान मिळवले.

भारताला दुसऱ्याच मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचे गोलमध्ये रूपांतर करताना वरुणने कोणतीही चूक केली नाही. मग ११व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारेच हरमनप्रीतने २-० अशी आघाडी वाढवली. पहिले सत्र संपायला काही सेकंदांचा अवधी बाकी असताना नकाबिले एन्टय़ूलीने गोल करण्याची संधी वाया दवडली.

मध्यंतराच्या पाच मिनिटे आधी भारताला पेनल्टी स्ट्रोक्सची संधी मिळाली. बिरेंद्र लाक्राने मारलेल्या फटक्यावर हरमनप्रीतने भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात बाजू बदलल्यानंतरही भारताचे वर्चस्व कायम राहिले.

तिसऱ्या सत्रात पाचव्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने दिलेल्या पासवर विवेकने भारताचा चौथा गोल साकारला. ४१व्या मिनिटाला भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु अमित रोहिदासचा गोल करण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेच्या गोलरक्षकाने हाणून पाडला.

भारताने आपले दडपण कायम ठेवताना ४९व्या मिनिटाला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळवला. वरुणने अप्रतिम गोल करून भारताला ५-० अशी आघाडी मिळवून दिली. मग ५३व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याद्वारे पॉट्झने गोल करीत आफ्रिकेचे खाते उघडले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat south africa 5 1 to win fih series finals
First published on: 16-06-2019 at 00:35 IST