आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकणारा भारतीय क्रीडापटू इक्बाल सिंग बोपाराई याला आपल्या आई आणि पत्नीच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पेन्स्लाव्हेनिया देशातील न्यूटन स्केअर येथे त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांना ९११ क्रमांकावर रविवारी या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, आपण आई आणि पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. त्यामुळे बोपाराईला लगेचच पोलिसांनी अटक केली.

बोपाराई हा मूळचा पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील आहे. बोपाराई हा ८०च्या दशकात भारताचा आघाडीचा गोळाफेकपटू होता. १८.७७मीटर लांब गोळाफेक करून त्याने दिल्लीतील स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली होती. १९८३ साली कुवेतमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने कांस्यपदकाची कमाई केली होती.

बोपाराईचा एक जवळचा मित्र टीओईशी बोलताना म्हणाला की इक्बालने आई आणि पत्नीची हत्या केल्याच्या घटनेवर माझा विश्वासच बसत नाही. कारण तो खूपच चांगला व्यक्ती होता. मी त्याच्या फिलाडेल्फियाच्या घरी अनेकदा राहिलेलो आहे. त्याची आई नव्वदीच्या आसपास असेल. त्याची पत्नीदेखील अतिशय शांत आणि प्रेमळ होती. त्याची मुलेदेखील चांगल्या ठिकाणी काम करतात. अशा परिस्थितीत नक्की असं काय घडलं असावं याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण तो गेले काही दिवस मानसिक तणावात होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याने या घटनेत स्वत:लाही इजा करून घेतली आहे आणि तो रूग्णालयात आहे, असे मित्राने सांगितले.