एकदिवसीय मालिकेत टिकण्यासाठी तिसरा सामना जिंकण्याचे भारतापुढे आव्हान
न्यूझीलंडच्या भूमीवरील दोन सलग पराभवांमुळे आता एकदिवसीय मालिका गमावण्याचे संकट समोर उभे आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवांनंतर भारताचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान खालसा झाले आहे. त्यामुळे ‘कठीण कठीण कठीण किती?’ अशी भारताची केविलवाणी अवस्था झाली आहे. आता न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकण्यासाठी भारताला संघाची फेररचना करण्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही संघातील बदलांचे संकेत दिले आहेत.
मालिकेतील ०-२ अशी पिछाडी आणि गमावलेला अग्रस्थानाचा मुकुट हे भारतीय संघासाठी क्लेशदायी ठरत आहेत. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सावरण्यासाठी ही भारताला अखेरची संधी आहे. जर धोनीसेना शनिवारी अपयशी ठरली तर दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ सलग दुसरी मालिका भारतीय संघ गमावेल.
नेपियरला झालेल्या पहिला एकदिवसीय सामन्यात भारताने २४ धावांनी पराभव पत्करला, तर हॅमिल्टनला झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १५ धावांनी पराजय झाला. पावसाचा फटका बसलेल्या या सामन्यात डकवर्थ-लुइस नियमामुळे भारतापुढील आव्हान अधिक बिकट झाले. एकंदर भारतीय संघाने मागील पाच एकदिवसीय सामन्यांपैकी चार सामने गमावले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे हे सर्व सामने भारताबाहेरील आहेत. धोनीला धावांचा पाठलाग करायला आवडते. त्यामुळेच त्याने दोन्ही सामन्यांत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण आता त्याला आपल्या निर्णयाचाही पुनर्विचार करावा लागणार आहे. याचप्रमाणे ईडन पार्कचे आकारमान भारताच्या चिंतेत आणखी भार घालणारे आहे.
पहिल्या दोन्ही सामन्यांत कोरे अँडरसनने भारतीय गोलंदाजांवर तुफानी आक्रमण केले, तर केन विल्यम्सनने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्य दिला. रॉस टेलरनेही दुसऱ्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. ऑफस्पिनर आर. अश्विनच्या खात्यावर न्यूझीलंडच्या भूमीवर एकही बळी जमा झालेला नाही. परंतु एकटय़ा अश्विनवरच टीका करणे योग्य ठरणार नाही. प्रमुख गोलंदाजांचा वापर करण्यातही धोनी अपयशी ठरत आहे. पॉवरप्ले आणि अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांना वापरता यावे, याची धोनी काळजी घेतो.
न्यूझीलंडमधील मैदानांचे आकारमान भारतीय फलंदाजांसाठी चिंता निर्माण करीत आहे. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांची मागील चार सामन्यांपैकी सर्वाधिक भागीदारी ही २२ धावा आहे. भारतीय भूमीवर आणि परदेशातील या दोघांचीही कामगिरी ही सहजपणे अधोरेखित होणारी आहे. भारतात तीनशेहून अधिक धावांचे लक्ष्य पेलतानाही धीराने खेळणारे हे दोन सलामीवीर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झगडताना आढळत आहेत. परदेशातील वेगवान गोलंदाजांसमोर आक्रमक फटके आणि आपला नैसर्गिक खेळ दाखवण्यात ते अपयशी ठरत आहेत. गेल्या वर्षीची या दोघांची कामगिरी अप्रतिम अशीच होती. २२ सामन्यांत ५९.३८च्या सरासरीने शर्मा-धवन जोडीने १२४७ धावा केल्या होत्या. त्यामुळेच भारताची आघाडीची फळी मोठय़ा धावसंख्या रचायची. परंतु परदेशातील कामगिरीमुळे त्यांच्यापुढे आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेने ३६ धावांचे योगदान देताना विराट कोहलीसोबत ९० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. कोहलीने आपले सातत्य टिकवून ठेवले आहे. मात्र सुरेश रैनाला धावा करणे कठीण जात आहे. या पाश्र्वभूमीवर धोनीला तिसऱ्या सामन्यात निश्चितपणे बदल करावे लागणार आहेत. अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, ईश्वर पांडे आणि वरुण आरोन संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
रैनाच्या कोपराला दुखापत
ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी सराव करताना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाच्या कोपराला दुखापत झाल्यामुळे त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘‘फलंदाजी करताना रैनाच्या डाव्या हाताच्या कोपरावर चेंडू आदळला. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या हाताचा एक्स-रे काढण्यात आला आहे. दुखापत फारशी गंभीर नसली तरी सामन्याच्या आधी शनिवारी त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केली जाईल,’’ असे भारतीय संघाचे व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांनी सांगितले. रैनाने गेल्या दोन सामन्यांत १८ आणि ३५ धावा काढल्यामुळे त्याच्या फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
संघ –
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्क्युलम (कर्णधार), कोरे अँडरसन, मार्टिन गप्तिल, मिचेल मॅक्क्लिनॅघन, नॅथन मॅक्क्युलम, कायले मिल्स, जेम्स नीश्ॉम, ल्युक रोंची (यष्टीरक्षक), जेसी रायडर, टिम साऊदी, रॉस टेलर, केन विल्यम्सन, हॅमिश बेनेट.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, वरुण आरोन, अमित मिश्रा.
सामन्याची वेळ : सकाळी ६.३० वाजल्यापासून.
भारतीय गोलंदाजांची परदेशातील कामगिरी
खेळाडू सामने सरासरी बळी
मोहम्मद शमी ५ ६.७० १६
आर. अश्विन ५ ५.८९ ०
इशांत शर्मा ४ ६.१२ ६
रवींद्र जडेजा ३ ६ ३
भुवनेश्वर कुमार ३ ५.७३ २
‘करो या मरो’ अशा स्थितीत असलेल्या तिसऱ्या सामन्यावर भारतीय संघाने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. आमच्यावर कोणतेही दडपण नसून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा सामना आम्हीच जिंकू, अशी खात्री आहे. मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही भारतापुढील समस्या नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे जेसी रायडर, मार्टिन गप्टिल, केन विल्यम्सन, रॉस टेलर आणि कोरे अँडरसन या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना लवकरात लवकर माघारी पाठवण्यावर आमचा भर असेल. परदेशातील वातावरणात खेळल्याचा फायदा मला होत आहे. त्यामुळे गोलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टय़ांवर चमक दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
-भुवनेश्वर कुमार, भारताचा वेगवान गोलंदाज
ईडन पार्कच्या खेळपट्टीकडून चेंडूला वेग आणि उसळी मिळण्याची शक्यता आहे. जर खेळपट्टीकडून चेंडूला वेग मिळाल्यास, आखूड टप्प्याच्या माऱ्याचा पर्याय आमच्याकडे असेल. खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. त्यातच सीमारेषेचे अंतर कमी असल्यामुळे आम्ही विशेष रणनीती आखणार आहोत. भारताच्या प्रत्येक फलंदाजासाठी आमच्याकडे डावपेच आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आमची रणनीती यशस्वी ठरली होती. न्यूझीलंडमधील मैदाने छोटी असल्यामुळे धावांचा पाठलाग करणे सोपे ठरते. पण भारताला दोन सामन्यांत या संधीचा फायदा घेता आला नाही. पहिले दोन सामने आम्ही जिंकले असले तरी पुढील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
– टिम साऊदी, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज