भारताचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस यांचा गुरुमंत्र

घानाविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत भारतीय खेळाडूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे मैदानाबाहेर संतापाने लालबुंद झालेले मुख्य प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस सामन्यानंतर मात्र भविष्याच्या दृष्टीने आश्वासक होते. कुमार विश्वचषकातील संघाची वाटचाल असफल संपूर्ण ठरल्यानंतर ‘पराभवाच्या गर्भात असे, उद्याचा उष:काल’ अशा आशयाचा गुरुमंत्र मातोस यांनी भारतीय फुटबॉल क्षेत्राला दिला. खेळाडूंमध्ये गुंतवणूक करून देशाला आशा दाखवायला हवी, असा सल्ला मातोस यांनी दिला.

‘‘भारतीय खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. त्यांचा मला अभिमान आहे. पण घानासारख्या संघाला नमवण्याची अपेक्षा त्यांच्याकडून करणे चुकीचे आहे. बलाढय़ संघांविरुद्ध अव्वल दर्जाच्या स्पर्धेत खेळणारा हा पहिलाच संघ आहे. त्यांच्यात आणि या खेळाडूंमध्ये बराच फरक आहे. या संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याआधी खेळाडूंच्या विकासासाठीची प्रक्रिया जाणून घ्यायला हवी,’’ अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस यांनी व्यक्त केली. विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान अपेक्षेप्रमाणे साखळीतच संपुष्टात आले. पण भारतीय खेळाडूंचा खेळ उल्लेखनीय झाला. त्यामुळेच या संघाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. विश्वचषक स्पर्धेतील तिन्ही सामन्यांत खेळाडूंना भरभरून प्रेम मिळाले. स्पर्धेपुरता पाठिंबा मिळाला, आता पुढे काय? भारतात फुटबॉल संस्कृती खरेच रुजली आहे का? असे अनेक प्रश्न मातोस यांच्या बोलण्यातून उपस्थित झाले.

भारताला अखेरच्या साखळी लढतीत माजी विश्वविजेत्या घानाकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्याचे विश्लेषण करताना मातोस म्हणाले, ‘‘भारतीय संघाने काही सोपे गोल होऊ दिले. हा मूर्खपणाच होता, परंतु भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने ही पावले आहेत. मालदीव, नेपाळ किंवा भूतान यांच्याविरुद्ध आम्ही खेळलो असतो तर वेगळा निकाल पाहायला असता. ही स्पर्धा अव्वल दर्जाची आहे आणि यजमान म्हणून पात्रता फेरीचा अडथळा पार न करता आम्ही स्पर्धेत प्रवेश मिळवला.’’

या स्पर्धेत प्रेक्षकांनी संघाला दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक करताना मातोस म्हणाले, ‘‘फुटबॉल संस्कृतीची सर्वाना ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. सर्वानी ती समजूनही घ्यायला हवी. मुले पाच-सहा वर्षांची असल्यापासून ही प्रक्रिया सुरू व्हायला हवी. विश्वचषक स्पर्धेत आमच्यासह पदार्पण करणाऱ्या न्यू कॅलेडोनिया संघाविरुद्धही आम्ही खेळलेलो नाही. भारताविरोधात एकूण नऊ गोल झाले. पण चिलीसारख्या संघालाही सात गोल सहन करावे लागले. भारतीय संघाचा मला अभिमान आहे आणि त्यांच्यात शिकण्याची जिद्द आहे. ही विलक्षण पिढी आहे, माझे हे शब्द लक्षात ठेवा. या देशाने पायाभूत सुविधापासून काम करायला हवे आणि त्यानंतर निकालाची नोंद होईल.’’

आपला मुद्दा स्पष्ट करताना मातोस यांनी यावेळी न्यूझीलंड संघाचे उदाहरण दिले. दहा वर्षांपूर्वी विश्वचषक स्पर्धेत किवी संघाविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी १३ गोल केले होते. पण त्यानंतर त्यांच्या कामगिरीत झालेल्या सुधारणेकडे लक्ष वेधताना मातोस म्हणाले, ‘‘१९९७च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी जोरदार हल्ले केले. पण त्यांनी संघटनात्मक बदल केले आणि ते सातत्याने या स्पर्धेत पात्र ठरत आहेत. भारतानेही आत्तापासून सुरुवात करायला हवी आणि आता ते सोपे आहे. प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला त्या दिशेने जायचे आहे की नाही. नसेल तर सर्वच अशक्य आहे. या खेळाडूंमध्ये गुंतवणूक करून देशाला आशा दाखवायला हवी.’’

राष्ट्रीय नायक धीरज मोइरांगथेम

गोलरक्षक धीरज मोइरांगथेम हा केवळ मणिपूरपुरताच मर्यादित राहिलेला नाही. आपल्या अभेद्य बचाव कौशल्यामुळे धीरज आता राष्ट्रीय नायक बनला आहे. त्याचा चुतल भाऊ शीतलजीतने धीरजचे छायाचित्र असलेले फलक स्टेडियमवर उंचावले आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. चेंडू अडवण्याच्या धीरजच्या प्रत्येक प्रयत्नावर प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. ‘इंडिया.. इंडिया..’ या गजराची जागा अधूनमधून ‘धीरज.. धीरज..’ असा जयघोष घेत होती. या वेळी प्रेक्षकांमध्ये बसलेले त्याचे वडील रोमीत यांचे डोळे पाणावलेले दिसले. स्टेडियममध्ये धीरजच्या आई-वडिलांसह तीन बहिणी आणि चुलत भाऊ शीतलजीत उपस्थित होता. ‘‘माझा भाऊ आज देशाचा नायक बनला आहे आणि त्याचा आम्हा कुटुंबीयांना किती अभिमान आहे, हे शब्दांत सांगता येणार नाही. धीरज अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याच्या फुटबॉल खेळण्याला घरातून विरोध होता. मात्र त्याने आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होऊ दिले नाही,’’ असे शीतलजीत सांगत होता. घानाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना प्रेक्षक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. धीरजच्या गावातील अनेक जणांनी त्याला आपल्याकडे बोलावले. धीरजनेही त्यांच्या प्रेमाचा मान राखत प्रेक्षकांसोबत ‘सेल्फी’ काढली.

आजचे सामने

’ वेळ : सायंकाळी ५ वा.

इ-गट : फ्रान्स वि. होंडुरास

इ-गट : जपान वि. न्यू कॅलेडोनिया

’ वेळ : रात्री ८ वा.

फ-गट : इंग्लंड वि. इराक

फ-गट : मेक्सिको वि. चिली

’ थेट प्रक्षेपण

इंग्रजी : सोनी टेन २ व टेन २ एचडी, सोनी ईएसपीएन व ईएसपीएन एचडी; हिंदी व बंगाली : सोनी टेन ३ व टेन ३ एचडी.