बँकॉक : भारतीय पुरुष संघाने बलाढय़ डेन्मार्कला ३-२ असे नमवून थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम दाखवला.

सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या दुहेरीतील विजयानंतर किदम्बी श्रीकांत आणि निर्णायक लढतीत एचएस प्रणॉय यांनी एकेरीचे विजय मिळवत भारतीय बॅडिमटनमधील ऐतिहासिक यशात सिंहाचा वाटा उचलला. रविवारी भारताचा अंतिम फेरीत इंडोनेशियाशी सामना होणार आहे.

पहिल्या एकेरीच्या सामन्यात व्हिक्टर एक्सलसेनने लक्ष्य सेनचा २१-१३, २१-१३ असा पाडाव करून १-० अशी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात रंकीरेड्डी आणि शेट्टी जोडीने किम अ‍ॅस्ट्रप आणि मथायस ख्रिस्टियानसन जोडीचे आव्हान २१-१८, २१-२३, २२-२० असे मोडित काढले. एक तास, १८ मिनिटांच्या कडव्या झुंजीमुळे सात्त्विक-चिराग जोडीने भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात श्रीकांतने अँडर्स अँटनसनला २१-१८, १२-२१, २१-१५ असे नामोहरम करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हा सामनासुद्धा एक तास, २० मिनिटे रंगला. त्यानंतर चौथ्या दुहेरीच्या सामन्यात कृष्णा प्रसाद गर्गा आणि विष्णूवर्धन गौड जोडीने १४-२१, १३-२१ अशी ३९ मिनिटांत हार पत्करली. त्यामुळे डेन्मार्कला २-२ अशी बरोबरी साधता आली. अखेरीस पाचव्या सामन्यात प्रणॉयने एक तास, १३ मिनिटांत रॅसमूस गेमकेला १३-२१, २१-९, २१-१२ असे हरवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

१ भारतीय पुरुष संघाने प्रथमच थॉमस चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.