भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात हरलीन देओलने सीमेरेषेवर जबरदस्त झेल पकडला. या झेलचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या झेल पकडल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या झेलसाठी नेटकऱ्यांनी तिला सुपरवुमन म्हणून संबोधलं आहे. हा अप्रतिम झेल एकदा पाहिल्यानंतर नेटकरी हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत. हरलीनने इंग्लंडच्या एमी जोन्सचा अप्रतिम झेल घेत तिला तंबूचा रस्ता दाखवला. एमीचा खेळपट्टीवर चांगलाच जम बसला होता. तिच्या आक्रमक खेळीमुळे भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडाली होती. तिने २७ चेंडूत ४३ धावा केल्या. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. अर्धशतकासाठी उत्तुंग फटका मारताना सीमेरेषेच्या बाहेर चेंडू जाईल इतका वेग होता. मात्र सुपरवुमन हरलीन देओलनं षटकार तर अडवलाच. त्याचबरोबर अप्रतिम झेल घेतला. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर एमी जोन्स बाद झाली.

भारताने इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना गमवला असला तरी हरलीन देओलच्या झेलची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या झेलनंतर अनेक क्रिकेटपटूंनी हरलीनचं कौतुक केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सर्वोत्तम झेल असल्याचं सांगितलं आहे. तर सुरेश रैना, हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या क्रिकेटपटूंनीही हरलीनचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इन्स्टास्टोरीवर हरलीनच्या कॅचचा व्हिडिओ शेअर केला आहे. हरलीनला टॅग करत “अद्भुत, खूप सुंदर”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

PM-MODI-Harleen-Catch

इंग्लंडने भारतासमोर ७ गडी गमवून १७७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पावसामुळे भारतासमोर ८ षटकं आणि ४ चेंडूत ७३ धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. मात्र भारतीय महिला संघ ३ गडी गमवून ५४ धावा करू शकला. भारताने हा सामना १८ धावांनी गमवला.