वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे भारताच्या विश्वचषक विजयाच्या वाटेतील प्रमुख अडसर असले तरी इंग्लंडमधील वातावरण हे भारताच्या अनुभवी गोलंदाजीसाठी पोषक आहे. त्यामुळेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला विश्वचषक उंचावण्याची सर्वाधिक संधी आहे, असे मत भारताचा कसोटीतील उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.

विश्वचषक स्पर्धेच्या नवीन स्वरूपाबद्दल रहाणे म्हणाला, ‘‘सुरुवातीला विजय आणि कामगिरीत सातत्य हे भारताच्या यशाचे रहस्य ठरणार आहे. भारतीय संघ सर्वच बाबतीत बलाढय़ मानला जात आहे. यंदा विश्वचषकाचे स्वरूप बदलले असून प्रत्येक संघाला साखळीत नऊ सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळेच सुरुवातीला काही सामने जिंकणे गरजेचे आहे.’’

‘‘इंग्लिश वातावरणात भारतीय गोलंदाजी हेच बलस्थान असणार आहे. भारताचा वेगवान आणि फिरकी मारा अनुभवी आहे. भारतीय संघातील गोलंदाज हे बळी मिळवून देण्यात पटाईत आहेत, ही सर्वात चांगली बाब म्हणावी लागेल. कोणत्याही वातावरणात बळी मिळवू शकतील, असे गोलंदाज आपल्याकडे आहेत,’’ असे रहाणेने सांगितले.