नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत आणि ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ज्या प्रकारे खेळ केला, त्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास भारताला चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची नामी संधी आहे, असे उद्गार ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार इडी ओकेनडेन याने काढले.
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर ६ डिसेंबरपासून चॅम्पियन्स चषक स्पर्धेला सुरुवात होणार असून जगातील अव्वल आठ संघ जेतेपदासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत. ‘‘भारतीय संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली असून त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. गेल्या महिन्यात आम्ही भारताविरुद्ध खेळलो, त्या वेळी हा संघ कोणत्याही संघाला नमवू शकतो, हे आमच्या लक्षात आले. भारतीय संघातील खेळाडू अनुभवी असून गेल्या दोन महिन्यांतील कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास, घरच्या मैदानावर भारतीय संघ चॅम्पियन्स चषकाला गवसणी घालेल,’’ असे ओकेनडेन म्हणाला.
‘‘ऑस्ट्रेलियाला अव्वल खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार असली तरी या स्पर्धेसाठी आमची तयारी चांगली झाली आहे. आमच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे जेतेपद कायम राखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सलग सहाव्यांदा चॅम्पियन्स चषकावर नाव कोरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असेही त्याने सांगितले.

तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद
चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या तिकीट विक्रीला हॉकीचाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत असून स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही सामन्यांची संपूर्ण तिकिटे विकली गेली आहेत. एका सत्राचे तिकीट २० रुपयांपासून उपलब्ध असून चाहत्यांना त्यात दोन सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. माजी हॉकी ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या सामन्याची मोफत तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अटीतटीच्या लढतींना चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.