काल एकीकडे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असतानाच world hockey league च्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा सुपडा साफ करुन टाकला होता. भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला जशी मैदानावर धूळ चारली तसेच आणखी एका कृतीने पाकिस्तानला खजील व्हायला भाग पाडले. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंनी सीमेवरील पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याचा निषेध म्हणून दंडावर काळ्या फिती लावल्या होत्या. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफाकडून सामन्यापूर्वी एकमताने हा निर्णय घेतला. काश्मीरमधील पाकच्या भ्याड हल्ल्यांचा निषेध करण्याची ही भारतीय हॉकी संघाची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१६ मध्ये भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार श्रीजेश पी.आर.श्रीजेश याने  चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचे विजेतेपद भारतीय जवानांना समर्पित केले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचाच पराभव केला होता. याशिवाय, सध्या भारतीय संघाचे नेतृत्त्व करत असलेल्या हरमनप्रीत सिंगनेही खेळाडूंनी आपल्या खेळाचा उपयोग देशाला संदेश देण्यासाठी करावा. ज्या गोष्टींवर आमचा विश्वास आहे त्यासाठी आम्ही नेहमीच उभे राहून लढा देतो, हे संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी आम्हाला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकायचाच होता, असे हरमनप्रीतने म्हटले. एकूणच भारतीय संघाने वेळोवेळी भारतीय सैन्याला जाहीरपणे पाठिंबा देत आपली राष्ट्रनिष्ठा दाखवून दिली आहे.

एकीकडे चॅम्पियन्स करंडकात भारत पाकिस्तान सामना सुरु असताना हॉकीच्या सामन्याला प्रेक्षक गर्दी करणार का, असा प्रश्न होता. मात्र, या सामन्यालाही प्रेक्षकांनी तितक्याच संख्येने हजेरी लावत खेळाडूंचं मनोबल वाढवलं. सुरुवातीपासून भारतीय संघाने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतला होता. १३ व्या मिनिटाला युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. रमणदीपने इंजेक्ट केलेला बॉल हरमनप्रीतने मोठ्या सहजतेने गोलपोस्टमध्ये धाडला. यानंतर फॉर्मात आलेली टीम इंडियाची गाडी जी सुरु झाली ती थांबलीच नाही.

तलविंदर सिंहने पाकिस्तानची बचावफळी भेदत अवघ्या ३ मिनीटांच्या अंतराने गोल करत ही आघाडी ३-० अशी वाढवली. यावेळी एस.व्ही.सुनील आणि तलविंदरमधला ताळमेळ हा केवळ वाखणण्याजोगा होता. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी अनेक चाली रचल्या, ज्यापुढे सर्व पाकिस्तानी खेळाडू हतबल दिलत होते.

मोदींनी सिंधू नदीच्या पाण्यात स्वत:ला बुडवून घ्यावे; पाकिस्तानी अँकरने ओकली गरळ

यानंतर अखेरच्या सत्रात पुन्हा भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानवर आक्रमणाला सुरुवात केली. आकाशदीप सिंहने ४७ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली. यानंतर अवघ्या दोन मिनीटात प्रदीप मोरेने ४९ व्या मिनीटाला उजव्या बाजूने अँगल घेत बॉल गोलपोस्टमध्ये धाडला. या आक्रमणापुढे पाकिस्तानने अखेरचा उपाय म्हणून गोलरक्षक बदली केला. त्यानंतर मोहम्मद भुट्टाने पाकिस्तानसाठी एकमेव मैदानी गोल झळकावला. परंतू त्यानंतर सामना संपायला अवघं एक मिनीट बाकी असताना आकाशदीप सिंहने पुन्हा एक गोल करत हे अंतर ७-१ असं केलं. या विजयामुळे वर्ल्ड हॉकी लिग सेमीफायनलच्या आपल्या गटात भारत अव्वल स्थानावर पोहचला आहे. भारताचा पुढचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे.