आज दुबळ्या स्कॉटलंड संघाविरुद्ध शानदार विजयासाठी भारत उत्सुक

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील भारताचे भवितव्य आता त्यांच्या हाती राहिलेले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध ‘अव्वल-१२’ फेरीमध्ये दिमाखदार विजय साजरा केल्यानंतर शुक्रवारी स्कॉटलंडविरुद्धही भारताला विजय अनिवार्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फटक्यांची आतषबाजी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

विश्वचषकामधील पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे भारताचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे. परंतु अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयासह भारताने  निव्वळ धावगती वाढवली आहे. आता भारताला स्कॉटलंड आणि नामिबिया या उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय आवश्यक असला तरी, जर-तरची काही समीकरणेही अनुकूल व्हावी लागणार आहेत. गट-२मधून पाकिस्तानने चार विजयांसह उपांत्य फेरीमधील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठीच्या स्पर्धेत न्यूझीलंडने नामिबिया किंवा अफगाणिस्तान या सामन्यांपैकी एक सामना गमावला तरच भारताचे स्वप्न जिवंत राहू शकते.

क्रॉस, डेव्हिवर मदार

स्कॉटलंडने ‘अव्वल-१२’ फेरीमधील तिन्ही सामने गमावले आहेत. न्यूझीलंड संघाने त्यांना १६ धावांनी नमवले होते. मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंग्टन, मायकेल लीस्क आणि जॉर्ज मुन्से यांच्यावर स्कॉटलंडच्या फलंदाजांची मदार आहे. याचप्रमाणे जोश डेव्ही, ब्रॅडली व्हील आणि सफायान शरीफ यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे.

सलामीवीर लयीत

दोन्ही सामन्यांमधील अपयशानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीर जोडीला अपेक्षित सूर गवसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध रोहितला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवण्याच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध पुन्हा रोहित-राहुल सलामीची जोडी जुळवण्यात आली. अफगाणिस्तानविरुद्ध ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनीही धडाकेबाज फटकेबाजी करीत धावांचा वेग वाढवला. त्यांना बढती देण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. मुंबईकर सूर्यकुमार यादवसुद्धा दुखापतीतून सावरला आहे.

अश्विनवर फिरकीची भिस्त

अफगाणिस्तानविरुद्ध जशी फलंदाजांनी आक्रमकता दाखवली, तशीच गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. चार वर्षांच्या अंतराने ट्वेन्टी-२० संघात परतलेल्या रविचंद्रन अश्विानने चार षटकांत १४ धावा देत दोन बळी मिळवण्याची किमया साधली. अश्विानचे पुनरागमन हे सकारात्मक यश आहे. पहिल्या दोन सामन्यांत खेळलेला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला दुखापत झाल्यामुळे अश्विानला संधी मिळाली. मोहम्मद शमीने टिच्चून गोलंदाजी करताना तीन बळी घेत जसप्रीत बुमराला उत्तम साथ दिली.