आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उभरत्या खेळाडूंच्या स्पर्धेत भारतीय संघाला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशमधील ढाका शहरात पार पडलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघावर ३ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानी संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात २६७ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ओमर युसूफ आणि हैदर अली यांनी पाकिस्तानला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर सैद बदर, कर्णधार रोहिल नाझीर आणि इम्रान रफीक यांनीही अखेरच्या फळीत मोलाच्या धावा जोडत पाकिस्तानची बाजू भक्कम केली. भारताकडून शिवम मवी, फिरकीपटू हृतिक शौकीन आणि सौरभ दुबे यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानेही चांगली सुरुवात केली. कर्णधार बेलुर रवी शरथ आणि आर्यन जुन्याल यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. जुन्याल माघारी परतल्यानंतर कर्णधार शरथने सनवीर सिंहच्या साथीने चांगली लढत दिली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. महत्वाच्या षटकांमध्ये भारताचे अरमान जाफर आणि यश राठोड हे फलंदाज माघारी गेल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला. यानंतरही लक्ष्य भारतीय फलंदाजांच्या अवाक्यात होतं, मात्र एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्यामुळे भारताचा डाव २६४ धावांत संपुष्टात आला. अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी ७ धावांची गरज होती, मात्र पाकच्या अमाद बटने केवळ ४ धावा देत पाकिस्ताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.