scorecardresearch

आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताची आज सलामी पाकिस्तानशी

पाकिस्तान काही नव्या चेहऱ्यांना स्पर्धेत संधी देणार आहे, तर अनुभवी बिरेंद्र लाक्राच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दिमाखदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल.

बिरेंद्र लाक्रा

भारतीय युवा खेळाडूंसमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान

जकार्ता : भारतीय हॉकी संघाची दुसरी फळी आशिया चषक हॉकी स्पर्धेत सोमवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सलामीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात दडपण झुगारून कामगिरी उंचावण्याचा भारताच्या युवा खेळाडूंचा प्रयत्न असेल.

पाकिस्तान काही नव्या चेहऱ्यांना स्पर्धेत संधी देणार आहे, तर अनुभवी बिरेंद्र लाक्राच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दिमाखदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. लाक्रा टोक्यो ऑलिम्पिकनंतर घेतलेल्या निवृत्तीनंतर पुनरागमन करत आहेत. आगामी व्यग्र हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आशिया चषक स्पर्धेत दुसऱ्या फळीची कामगिरी अजमावण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. आगामी काळात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ‘एफआयएच’ विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. भारत यजमान असल्याने विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानचा प्रयत्न २०२३ मध्ये भुवनेश्वरला होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा असेल. या स्पर्धेतील अग्रस्थानी असलेले तीन संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. भारताने २०१७ मध्ये ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात मलेशियाला पराभूत करत जेतेपद मिळवले होते.

भारताच्या २० सदस्यीय संघाला माजी कर्णधार सरदार सिंग मार्गदर्शन करणार आहे. या स्पर्धेसाठी टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या रुिपदर पाल सिंगला संघाचे नेतृत्व करायचे होते. त्यानेही निवृत्तीतून माघार घेत पुनरागमन केले होते, मात्र दुखापतीमुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागले. आणखी एक अनुभवी हॉकीपटू एसव्ही सुनीलनेही निवृत्तीनंतर पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे त्याला टोक्यो ऑलिम्पिक संघात सहभागी होता आले नव्हते. तो या स्पर्धेत संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India men s hockey team set to open hero asia cup campaign against pakistan zws

ताज्या बातम्या