प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांचे प्रतिपादन; भारतीय पुरुष हॉकी संघाचे आगमन
ऑलिम्पिक स्पध्रेतील पदकांचा दुष्काळ रिओतही भारतीय पुरुष हॉकी संघाला संपवण्यात अपयश आले असले तरी संघाच्या कामगिरीवर प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी समाधान व्यक्त केले आहे. भारतीय संघाची कामगिरी आदर्शवत नसली तरी समाधानकारक नक्कीच होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुरुवारी भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाचे मायदेशात आगमन झाले.
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत ‘अ’ गटात भारताने दोन विजय, एक अनिर्णीत आणि एक पराभव अशा निकालासह चौथे स्थान पटकावले. या दोन विजयांमध्ये एक विजय हा सुवर्णपदक विजेत्या अर्जेटिनाविरुद्ध मिळवला होता, परंतु उपांत्यपूर्व फेरीत त्यांना बेल्जियमने पराभूत केले.
‘‘आमच्या तयारीच्या तुलनेत निकाल आदर्शवत नसला तरी समाधानकारक नक्कीच आहे. प्रतिस्पर्धी संघाला अखेरच्या सत्रापर्यंत आम्ही झुंजवले. हा उच्च दर्जाचा संघ आहे. काही वेळा चांगला खेळ करूनही निकाल आपल्या बाजूने लागत नाही. या संघाने बरेच काही शिकले आहे. त्यांना आता अल्प विश्रांतीची गरज आहे आणि लवकरच ते पुन्हा मैदानावर परततील,’’ असे ओल्टमन्स म्हणाले.
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. हा अनुभव प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचा होता, असे कर्णधार व गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सांगितले. तो म्हणाला, ‘‘ऑलिम्पकसारख्या मोठय़ा व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. आमची कामगिरी चांगली झाली. आता झालेल्या चुका सुधारण्यावर लक्ष्य केंद्रित करायला हवे आणि भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी सज्ज व्हायला हवे.’’