भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मालिकेमधील काही सामन्यांच्या वेळा लवकर घेण्यात आल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले.
 चेन्नईमध्ये ३० डिसेंबरला होणारा पहिला एकदिवसीय सामना सकाळचा खेळविण्यात येणार आहे, तो सकाळी ९ वाजता सुरू होईल. याचप्रमाणे ३ आणि ६ डिसेंबरला होणारे उर्वरित दोन एकदिवसीय सामने दुपारी १२ ते ७.४५ वाजेपर्यंत खेळविण्यात येणार आहे. याबाबत कोणतेही अधिकृत कारण बीसीसीआयने दिले नसले तरी, भारतात रात्री दव पडत असल्यामुळे या सामन्यांच्या वेळा लवकर घेण्यात आल्याचे समजते. सामन्याच्या निकालातील दवाची भूमिका लक्षात घेता बुधवारी भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या वेळाही लवकर करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता.
भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना बंगळुरूला २५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता सुरू होईल, तर दुसरा सामना अहमदाबादला २८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.