* भारताची उपांत्यपूर्व फेरीतील लढत आज बेल्जियमशी
* चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत गुरुवारी बेल्जियमशी होणार असून लंडन ऑलिम्पिकमधील पराभवाचा वचपा काढण्याचे भारताचे मनसुबे आहेत. ‘अ’ गटात अव्वल स्थानी असलेल्या भारतीय हॉकी संघाला खेळाडूंच्या दुखापतींची चिंता सतावत आहे.
साखळी गटात दोन विजय आणि बरेचसे गोल रचल्यामुळे भारताने सहा गुणांसह अव्वल स्थानी मजल मारली. मात्र आठही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील, या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नव्या नियमांनुसार आता भारताची लढत ‘ब’ गटातील तळाच्या बेल्जियमशी होणार आहे.
लंडन ऑलिम्पिकमधील पराभवाचा वचपा काढून जास्तीत जास्त गोल रचण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मात्र तीन प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती, ही भारतीय संघासमोरील मोठी समस्या आहे. कर्णधार सरदारा सिंग खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असून मधल्या फळीतील मनप्रीत सिंग याच्या कानाच्या खाली टाके पडले आहेत. एस. व्ही. सुनीलच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत. मात्र हे तीनही खेळाडू बेल्जियमविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात नक्कीच खेळतील, असा विश्वास भारतीय संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी व्यक्त केला. दुसरीकडे बेल्जियमने साखळी गटातील सर्व सामने गमावले असले तरी विजयाची बोहनी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.