रमणदीप सिंगने केलेल्या दोन मैदानी गोलच्या बळावर भारताने कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत नवव्या आणि १२व्या स्थानासाठी झालेल्या लढतीत अर्जेटिनावर ४-२ असा सहज विजय मिळवला. आता नवव्या आणि दहाव्या क्रमांकासाठी होणाऱ्या लढतीत भारताला पाकिस्तानशी झुंज द्यावी लागेल.
रमणदीप (चौथ्या आणि ३१व्या मिनिटाला), अमित रोहिदास (सातव्या मिनिटाला) आणि गुरजिंदर सिंग (४०व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. अर्जेटिनाकडून लुकास मार्टिन्झ (३८व्या मिनिटाला) आणि लौटारो डिआझ (६९व्या मिनिटाला) यांनी गोल केले. सामन्याला सुरुवात झाल्यापासूनच भारताने खेळावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला रमणदीपच्या गोलमुळे भारताने खाते खोलले. तीन मिनिटांनंतर अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल लगावत भारताची आघाडी वाढवली. अर्जेटिनाला लागोपाठ दोन पेनल्टी-कॉर्नर मिळाले, पण भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांना गोल करण्यात अपयश आले.