पीटीआय, नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांसाठी जायबंदी जसप्रीत बुमराच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराच्या पाठीला दुखापत झाली असून तो आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे. ‘‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी- २० मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने जायबंदी बुमराच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश केला आहे. बुमरा पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि तो आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी आपल्या निवेदनात म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिराजने आतापर्यंत पाच ट्वेन्टी-२० सामने खेळले असून त्यात पाच बळी मिळवले आहेत. त्याने आपला अखेरचा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना यावर्षी फेब्रुवारीत श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना २ ऑक्टोबरला गुवाहाटी आणि तिसरा सामना ४ ऑक्टोबरला इंदूर येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India south africa twenty20 series siraj replaces bumrah ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST