वृत्तसंस्था, पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर चार गडी व १२ षटके राखून विजय मिळवला.

श्रीलंकेने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधनाने (४ धावा) पुन्हा एकदा निराशा केली. तिसऱ्या स्थानी फलंदाजीस आलेल्या यास्तिका भाटियालाही (१) टिकाव धरता आला नाही. सलामीवीर शफाली वर्माने (४० चेंडूंत ३५ धावा) काही आक्रमक फटके मारले, मात्र रणवीराने तिला बाद करत भारताची अवस्था ३ बाद ६१ अशी केली. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने हरलीन देओलच्या (४० चेंडूंत ३४ धावा) साथीने भारताचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या गडय़ासाठी ६२ धावांची संयमी भागीदारी रचली. या दोघीही बाद झाल्यानंतर मैदानात आलेली रिचा घोषही (६) माघारी परतली. मग दीप्ती व पूजा वस्त्रकार (नाबाद २१) यांनी भारताला सामना जिंकवून दिला. यजमानांकडून गोलंदाजीत इनोका रणवीराने (३९ धावांत ४ बळी) चुणूक दाखवली.

त्यापूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. त्यांच्याकडून हासिनी परेरा (३७ धावा), नीलाक्षी डीसिल्वा (४३ धावा) आणि हर्षिता मडवी (२८ धावा) वगळता इतर कोणालाही मैदानावर टिकता आले नाही. भारताकडून दीप्तीला रेणुका शर्मा (२९ धावांत ३ बळी), वस्त्रकार (२६ धावांत २ बळी) यांची गोलंदाजीत चांगली साथ मिळाली.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ४८.२ षटकांत सर्व बाद १७१ (नीलाक्षी डीसिल्वा ४३, हासिनी परेरा ३७; दीप्ती शर्मा ३/२५, रेणुका शर्मा ३/२९) पराभूत वि. भारत : ३८ षटकांत ६ बाद १७६ (हरमनप्रीत कौर ४४, शफाली वर्माने ३५; इनोका रणवीरा ४/ ३९)

  •   सामनावीर : दीप्ती शर्मा