जागतिक लीग फायनल्स हॉकी स्पर्धेतील भारताची पराभवाची मालिका कायम आहे. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला ‘अ’ गटातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १-३ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
न्यूझीलंडने पहिल्या सत्रात एक आणि दुसऱ्या सत्रात दोन मैदानी गोल लगावले.
शीआ मॅकलेसी (पहिल्या मिनिटाला) आणि स्टीफन जेनेस (४०व्या आणि ५०व्या मिनिटाला) यांनी गोल करत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा पहिला विजय ठरला. सामना संपायच्या दोन मिनिटेआधी मनदीप सिंगने गोल करत भारतासाठी पहिला गोल केला.