U19 Women’s T20 World Cup Final Details in Marathi: १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला. शुक्रवार ३१ जानेवारी रोजी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा ९ विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारतीय संघ १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या स्पर्धेत दोन उपांत्य फेरीचे सामने झाले. पहिल्या फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दुसऱ्या फेरीत भारताने इंग्लंडला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना रविवार २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता संघ आहे.

भारत वि दक्षिण आफ्रिका U19 टी-२० विश्वचषक फायनल किती वाजता सुरू होणार?

भारत वि दक्षिण आफ्रिकेचा महिला अंडर-१९ संघ अंतिम फेरीत भिडताना दिसणार आहेत. हा अंतिम सामना बायुम्मास ओव्हल क्वालालंपूर येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १२ वाजता खेळवला जाईल.

भारतीय संघाने आतापर्यंत महिलांच्या अंडर-१९ टी-२० वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी सर्व सहा सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये गट टप्प्यातील सामने सुपर सिक्स फेरी आणि उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला होता. यानंतर यजमान मलेशियाचा १० गडी राखून पराभव केला. टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचाही ६० धावांनी पराभव झाला. तर भारताची सलामीवीर त्रिशा गोंगाडीच्या शतकाच्या जोरावर भारताने स्कॉटलंडविरूद्ध १५० धावांनी मोठा विजय नोंदवला. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. तर अंतिम फेरीत पोहोचलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही या स्पर्धेत एकही सामन्यात पराभूत झालेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.