जो जिता वही सिकंदर!

भारताची या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपराजित राहण्याची किमया.. गेल्या सात वर्षांत दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरण्याचा अनुभव गाठीशी..

भारताची या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपराजित राहण्याची किमया.. गेल्या सात वर्षांत दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरण्याचा अनुभव गाठीशी.. महत्त्वाच्या क्षणी नेहमीच कामगिरी उंचावण्याची करामत करणारा भारतीय संघ.. दुसरीकडे, सात वर्षांत चार वेळा आयसीसी विश्वचषकाने हुलकावणी दिलेला श्रीलंका संघ.. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सहजपणे पार करणारा श्रीलंका संघ.. अशा या आशियातील दोन बलाढय़ संघांमध्ये रविवारी आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. ‘जो जिता वहीं सिकंदर’ हे खरे ठरवत भारतीय संघ दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झालेला आहे.
महेंद्रसिंग धोनीला आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची संधी रविवारी मिळणार आहे. भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्यास, तीन विश्वचषक जिंकणारा एकमेव कर्णधार म्हणून धोनीचे नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि वेस्ट इंडिजचे क्लाइव्ह लॉइड यांनी दोन वेळा विश्वचषकावर मोहोर उमटवली आहे. तिसऱ्या विश्वचषकासह धोनीच्या कारकिर्दीचे चक्र पूर्ण होणार आहे. २००७मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील युवा संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. त्यानंतर भारतीय संघाने कसोटीतील अग्रस्थानाचा मुकुट परिधान केला आणि २०११मध्ये आयसीसी विश्वचषकावर मोहोर उमटवली. गेल्या वर्षी भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही जेतेपद आपल्या नावावर केले. ट्वेन्टी-२० या झटपट क्रिकेटपासून सुरू झालेले हे यशाचे वर्तुळ ट्वेन्टी-२० विश्वचषकासह पूर्ण होणार आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेत सलग पाचही सामने जिंकून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये कामगिरी उंचावण्याचा इतिहास पाहता, श्रीलंकेविरुद्ध भारतालाच विजयाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. धावांचा पाठलाग करणे वा प्रतिस्पर्धी संघाला रोखणे असो, भारताने प्रत्येक आव्हान लीलया पार केले आहे. रविचंद्रन अश्विन, अमित मिश्राची सुरेख फिरकी आणि विराट कोहली, रोहित शर्माची चमकदार फलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरत आली आहे. बरोबर तीन वर्षे आणि तीन दिवसांआधी महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराला षटकार ठोकून भारताला २०११ विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
श्रीलंकेचा अंतिम फेरीतील वाईट इतिहास
अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने १९९६च्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावून नवा अध्याय लिहिला. मात्र गेल्या सात वर्षांत श्रीलंकेला तब्बल चार वेळा आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००७च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने तर २०११मध्ये भारताने श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. २००९च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने तर २०१२मध्ये वेस्ट इंडिजने त्यांना घरच्या मैदानावर पराभूत केले. हा वाईट इतिहास पुसण्याची संधी श्रीलंकेला पुन्हा एकदा मिळाली आहे.
कर्दनकाळ कोहली

शिखर धवन फार्मात नसल्यामुळे अजिंक्य रहाणेला संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत रहाणेने रोहित शर्मासह भारताला चांगली सुरुवात करून दिल्यामुळे धवनला अंतिम सामन्यासाठी संधी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अश्विनची कामगिरी दिवसेंदिवस सुधारत असून अमित मिश्रा आणि भुवनेश्वर कुमार यांना आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलेच चोपले होते. विराट कोहली सध्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७२ धावांची खेळी करून कोहलीने भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश सुकर केला होता. लसिथ मलिंगाच्या भेदक यॉर्कर चेंडूंना कोहली कसे परतवून लावतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गोलंदाजांवरच श्रीलंकेच्या आशा
ट्वेन्टी-२० विश्वचषकात तिसऱ्या वेळेला तरी श्रीलंकेचे नशीब पालटेल, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. श्रीलंकेची फलंदाजी फारशी चांगली होत नसल्यामुळे त्यांच्या आशा गोलंदाजांवरच आहेत. लाहिरू थिरिमाने आणि कुशल परेरा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा श्रीलंकेला आहे. त्याचबरोबर अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळणाऱ्या महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या अनुभवी फलंदाजांकडून भरीव योगदान अपेक्षित आहे. फिरकीपटू रंगना हेराथला संघात सामावून घेण्यासाठी कर्णधार दिनेश चंडिमलला अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळू शकणार नाही. त्यामुळे लसिथ मलिंगा श्रीलंकेचे नेतृत्व सांभाळणार आहे.

२०११ विश्वचषकाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारत उत्सुक जयवर्धने, संगकाराला विजयाची भेट?
महेला जयवर्धने, कुमार संगकारा हे श्रीलंकेचे दोन खंदे फलंदाज. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने अनेक शिखरे पादाक्रांत केली. आता हे अनुभवी फलंदाज कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आले असून दोघांनीही या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अंतिम फेरीतील पराभवांचा इतिहास पाहता, श्रीलंका संघ या दिग्गज खेळाडूंना विजयाची भेट देईल का, याची उत्सुकता आहे.

दृष्टिक्षेप आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेवर
वर्ष    विजेता    उपविजेता    यजमान
२००७    भारत    पाकिस्तान    द. आफ्रिका
२००९    पाकिस्तान    श्रीलंका    इंग्लंड
२०१०    इंग्लंड    ऑस्ट्रेलिया    विंडीज
२०१२    विंडीज    श्रीलंका    श्रीलंका

वाद हे भारतीय क्रिकेटचा भाग आहेत. खेळायला लागल्यापासून प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीत माझे नाव असतेच. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणे, हे माझे उद्दिष्ट असते. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींबाबत मी विचार करतो आणि त्यानुसार रणनीती आखतो. कर्णधाराचे यश संघाच्या कामगिरीवर अवलंबून असते. अंतिम लढतीत सर्वोत्तम खेळ करणे आणि देशाला विश्वचषक जिंकून देणे, हे प्रमुख ध्येय आहे. अन्य गोष्टी गौण आहेत. श्रीलंका संतुलित आणि गुणवान खेळाडूंचा संघ आहे. युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ तुल्यबळ आहे.
-महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

भारतीय संघ :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी आणि शिखर धवन.

भारताची वाटचाल
प्रतिस्पर्धी    निकाल
साखळी
    पाकिस्तान    सात विकेट्सनी विजयी
    वेस्ट इंडिज    सात विकेट्सनी विजयी
    बांगलादेश    आठ विकेट्सनी विजयी
    ऑस्ट्रेलिया    ७३ धावांनी विजयी
उपांत्य फेरी
दक्षिण आफ्रिका    सहा विकेट्सनी विजयी

विराट कोहली चांगला फलंदाज आहे. मात्र एका चांगल्या चेंडूवर त्याला बाद करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांमध्ये आहे. सामना जिंकून देण्याची त्याच्यात क्षमता आहे. मात्र आमच्या गोलंदाजांनी तो चांगला चेंडू टाकल्यास आमचे काम सोपे होईल. ही लढत एका खेळाडूपुरती मर्यादित नाही. २० षटके चांगला खेळ करणे महत्त्वाचे आहे. भूतकाळात कशी कामगिरी झाली आहे, यापेक्षा रविवारी आम्ही कसा खेळ करतो, त्यावर सारे काही अवलंबून आहे. भारताविरुद्ध आम्ही चांगले खेळतो, हे सिद्ध करण्यासाठी हा सामना नाही. विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.
-लसिथ मलिंगा, श्रीलंकेचा कर्णधार

श्रीलंका
लसिथ मलिंगा (कर्णधार), दिनेश चंडिमल, कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, सचित्र सेनानायके, सुरंगा लकमल, रंगना हेराथ, अजंथा मेंडिस, सीकुगे प्रसन्ना.

श्रीलंकेची वाटचाल
प्रतिस्पर्धी    निकाल         
साखळी
दक्षिण आफ्रिका    ५ धावांनी विजयी
नेदरलँड्स         ९ विकेट्सनी विजयी
इंग्लंड               ६ विकेट्सनी पराभूत
न्यूझीलंड         ५९ धावांनी विजयी
उपांत्य फेरी
वेस्ट इंडिज         २७ धावांनी विजयी
(डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार)

सामन्याची वेळ : संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वाहिनीवर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India to take on shri lanka today