सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यातही बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला असून, टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गप्टील आणि निकोल्स यांनी पहिल्या विकेटसाठी दमदार सुरुवात केली. १०६ धावांच्या भागीदारीदरम्यान गप्टीलने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अखेरीस युजवेंद्र चहलने गप्टीलला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्याने ४६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना झटपट माघारी धाडण्यात भारताला यश आलं. मात्र निकोल्सने एक बाजू सांभाळून धरत सामना न्यूझीलंडच्या हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली.

शार्दुल ठाकूरने निकोल्सला माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. त्याने ८० धावांची खेळी केली. मधल्या फळीत जिमी निशमही स्वस्तात माघारी परतला. यानंतर टॉम लॅथम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमने फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. डी-ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, तर रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, मधल्या फळीत लोकेश राहुलचं शतक आणि त्याला श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत दिलेल्या भक्कम साथीवर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात २९६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे अखेरच्या वन-डे सामन्यातही भारताची सुरुवात खराब झाली. मात्र लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरने मधल्या फळीत भारताचा डाव सावरला.

भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात संधी मिळालेला मयांक अग्रवाल एक धाव काढून माघारी परतला. जेमिन्सनने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर कर्णधार विराट कोहलीही हमिश बेनेटच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यामुळे भारताला दुसरा धक्का बसला. मात्र श्रेयस अय्यरने गांभीर्य ओळखत आधी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. श्रेयस अय्यर ६२ धावांची खेळी केल्यानंतर माघारी परतला. श्रेयस आणि लोकेश राहुल यांच्यात शतकी भागीदारीही झाली.

यानंतर लोकेश राहुलने मनिष पांडेच्या साथीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. अखेरच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. राहुलने यादरम्यान आपलं शतकही साजरं केलं. मात्र अखेरच्या षटकांमध्ये धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल हमिश बेनेटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ११३ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. या शतकी खेळीत ९ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. लागोपाठ मनिष पांडेही ४२ धावांवर माघारी परतला. अखेरीस तळातल्या फलंदाजांनी भारताला २९६ धावांपर्यंत मजल मारुन दिली. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने ४, तर जेमिन्सन आणि निशमने प्रत्यकेी १-१ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of new zealand 2020 3rd odi mount maunganui live updates psd
First published on: 11-02-2020 at 07:08 IST