जसप्रीत बुमराह-भुवनेश्वर कुमार यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९४ धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं आहे. पहिल्या डावात आफ्रिकेला नाममात्र ७ धावांची आघाडी घेता आली आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय आक्रमणाचा सामना करु शकला नाही. हाशिम आमलाने एक बाजू लावून धरत अर्धशतक साजरं केलं. मात्र दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत गेल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी घेता आली नाही.

भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ५ गडी घेतले. त्याला भुवनेश्वर कुमारने ३ तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. पहिल्या डावात आफ्रिकेकडे अवघ्या ७ धावांची आघाडी असल्यामुळे भारताला या सामन्यावर पकड घेण्याची चांगली संधी आहे. दुसऱ्या डावात पार्थिव पटेलने मुरली विजयसोबत सलामीला येत भारतीय डावाची आक्रमक सुरुवात केली.

पार्थिव पटेलच्या फटकेबाजीमुळे भारताने दुसऱ्या डावात झटपट आघाडी घेतली. मात्र वर्नेन फिलँडरच्या गोलंदाजीवर पटेल दुर्दैवीरित्या झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि मुरली विजय जोडीने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत भारताची पडझड थांबवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने १ गडी गमावत ४९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात भारताकडे ४२ धावांची आघाडी आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय फलंदाज या आघाडीत किती धावांची भर टाकण्यात यशस्वी ठरतात हे पहावं लागणार आहे.

  • भारताकडे ४२ धावांची आघाडी
  • दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताची धावसंख्या ४९/१
  • लोकेश राहुल – मुरली विजय जोडीने भारताची पडझड रोखली
  • फिलँडरच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेल माघारी, दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का
  • भारताला आघाडी, पार्थिव पटेल आक्रमक पवित्र्यात
  • भारताची आक्रमक सुरुवात, सलामीला आलेल्या पार्थिव पटेलचे रबाडाच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार
  • आफ्रिकेचा पहिला डाव १९४ धावांत आटोपला, पहिल्या डावात नाममात्र ७ धावांची आघाडी
  • लुंगी निगडी माघारी, आफ्रिकेचा अखेरचा गडी माघारी
  • फेलुक्वायो बाद, आफ्रिकेचा नववा गडी माघारी
  • वर्नेन फिलँडर माघारी, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर झेलबाद. आफ्रिकेला आठवा धक्का
  • आमलाच्या पहिल्या डावात ६१ धावा
  • जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पांड्याकडे झेल देत आमला माघारी, आफ्रिकेला सातवा धक्का
  • हाशिम आमलाचा अडसर दूर करण्यात भारताला यश
  • फिलँडर – आमलाने आफ्रिकेची संभाव्य पडझल थांबवली, चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिका १४३/६
  • मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर पटेलने पकडला डी-कॉकचा झेल, आफ्रिकेला सहावा धक्का
  • क्विंटन डी-कॉक आणि हाशिम आमलाकडून आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • जसप्रीत बुमराहने उडवला कर्णधार फाफ डु प्लेसिसचा त्रिफळा, आफ्रिकेला पाचवा धक्का
  • आफ्रिकेने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • भुवनेश्वर कुमारचा आफ्रिकेला आणखी एक दणका, एबी डिव्हीलियर्स त्रिफळाचीत
  • पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात
  • पहिल्या सत्राची घोषणा, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ८१/३
  • अजिंक्य रहाणेने टिपला झेल, आफ्रिकेला तिसरा धक्का
  • इशांत शर्माने आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली, कगिसो रबाडा माघारी
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी
  • नाईट वॉचमन कगिसो रबाडा आणि हाशिम आमलाने आफ्रिकेचा डाव सावरला
  • पार्थिव पटेलकडे झेल देत माघारी, आफ्रिकेला दुसरा धक्का
  • सलामीवीर डीन एल्गरला माघारी धाडण्यात भुवनेश्वर कुमारला यश
  • दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात