भुवनेश्वर कुमारने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आफ्रिकेचा निम्मा संघ गारद करत पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. भारतीय संघाने दिलेलं २०४ धावांचं आव्हान आफ्रिकेच्या संघाला पेलवलं नाही. रेझा हेंड्रीक्सचा अपवाद वगळता एकही आफ्रिकन फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. अखेर भारताने या सामन्यात २८ धावांनी विजय संपादन केला. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांनी डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. मात्र रोहित शर्मा फटकेबाजी करण्याच्या नादात लवकर माघारी परतला. मात्र शिखर धवनने मधल्या फळीतील इतर फलंदाजांना हाताशी धरुन भारताला धावांचा डोंगर उभा करुन देण्यात मदत केली. शिखरने सामन्यात ३९ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावा केल्या. आफ्रिकेकडून ज्युनिअर डालाने २ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात भारताप्रमाणेच झाली. फटकेबाजी करण्याच्या नादात जेजे स्मट लवकर माघारी परतला. यानंतर कर्णधार जे. पी. ड्युमिनी, डेव्हिड मिलर ही अनुभवी मंडळी मैदानात फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र रेझा हेंड्रीक्सने फरहान बेहरदीनच्या सहाय्याने ८१ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भुवनेश्वर कुमारने आफ्रिकेच्या फलंदाजांना एकामागोमाग एक धक्के देत त्यांच्या आव्हानातली हवाच काढून टाकली. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांमध्ये आफ्रिकेचा संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.