भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने महेंद्रसिंह धोनीच्या नावावर जमा असलेला विक्रम मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात वृद्धीमान साहा कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. केप टाऊन कसोटीत साहाच्या नावावर दहा बळी जमा झाले आहेत. याआधी धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत यष्टीमागे ९ बळी घेतले होते. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मॉर्ने मॉर्कलचा झेल पकडत साहाने धोनीला मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहाने घेतलेल्या दहा बळींमध्ये सर्व बळी हे झेल स्वरुपात घेतलेले आहेत. तर धोनीने घेतलेल्या ९ बळींमध्ये ८ झेल आणि एका यष्टीचीतचा समावेश होता. महेंद्रसिंह धोनीच्या आधी नयन मोंगियाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम जमा होता. मोंगियाने १९९६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यष्टीमागे ८ झेल घेतले होते. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॅक रसेल या यष्टीरक्षकाच्या नावावर जमा आहे. रसेलने १९९५ साली जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेविरुद्ध ११ झेल घेतले होते.

३३ वर्षीय वृद्धीमान साहाने पहिल्या डावात डीन एल्गर, हाशिम आमला, कर्णधार फाफ डु प्लेसीस, क्विंटन डी कॉक आणि कगिसो रबाडा तर दुसऱ्या डावात क्विंटन डी कॉक, डु प्लेसीस, केशव महाराज आणि मॉर्ने मॉर्कल यांचे झेल पकडले. आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या वृद्धीमान साहाच्या नावावर यष्टींमागे ८५ बळी जमा आहेत. यामध्ये ७५ झेल आणि १० यष्टीचीत बळींचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of south africa 2018 wridhhiman saha break record of ms dhoni of most dismissal by indian wicket keeper in test
First published on: 08-01-2018 at 20:13 IST