वन-डे मालिकेत ३-० ने पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेच्या संघासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. उपुल थरंगाच्या जागी संघाचं कर्णधारपद भूषवणारा चमार कपुगेदरा पाठदुखीने त्रस्त असल्याचं समजतंय. कपुगेदराच्या अनुपस्थितीत लसिथ मलिंगाकडे श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. याआधी दिनेश चंडीमल हा दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे असा दुखापतग्रस्त संघ भारताला कशी लढत देणार हे पहावं लागणार आहे.

कपुगेदराच्या दुखापतीविषयी बोलताना श्रीलंकेच्या संघाचे व्यवस्थापक असनाका गुरुसिन्हा म्हणाले, “कपुगेदराच्या दुखापतीबद्दल मी संघाच्या फिजीओंशी बोललो आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण त्याच्या सहभागाविषयी अजुन नेमकं सांगता येणार नाही. सध्या संघातील ५ ते ६ खेळाडू सराव करतायत, त्यामुळे कपुगेदराला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतलाय. अंतिम संघात त्याच्या सहभागाबद्दल उद्या निर्णय घेण्यात येईल.”

अवश्य वाचा – सामने कसे जिंकतात,? आम्ही विसरलोय!

कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे सामन्यांची मालिकाही श्रीलंकेने गमावली आहे. याआधी कपुगेदराने श्रीलंकेचा संघ सामने कसे जिंकतात हे विसरलाय असं वक्तव्य केलं होतं. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी अवघ्या ८ धावांची गरज होती. यावेळी श्रीलंकेच्या संघाची कामगिरी पाहून चाहत्यांनी मैदानात पाण्याच्या बाटल्या फेकून सामन्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत सामना पुन्हा सुरु केला होता. त्यामुळे एकंदरीतच भारताचा संघ आजारी पडलेल्या श्रीलंकेच्या संघाशी खेळणार असल्याने उरलेल्या सामन्यांमध्ये किती चुरस राहील हे जगजाहीर आहे.