चॅम्पियन्स करंडकात अंतिम फेरीत भारताने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता संघातील ज्येष्ठ खेळाडूंच्या सहभागावर चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. आगामी २०१९ विश्वचषकाचा विचार करता धोनी आणि युवराज किती काळ संघात राहणार याबद्दल विचार व्हायला हवा असं मत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलंय. ईएसपीएन क्रिकिन्फो या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राहुलने हे मत व्यक्त केलंय.

संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने हा निर्णय घेणं गरजेचं आहे. आगामी काळात कामगिरी सुधारण्यासाठी आपला नेमका आराखडा काय असेल आणि त्यात हे दोन्ही खेळाडू नेमके कुठे बसतायत का??? की धोनी आणि युवराज आता संघात फिट बसत नाहीयेत किंवा दोघांपैकी एकालाच संघात जागा मिळू शकेल या सर्व बाबींवर निवड समिती आणि व्यवस्थापनाने विचार करणं गरजेच असल्याच द्रविड म्हणाला. जर तुम्हाला धोनी आणि युवराजचा पर्याय शोधायचा असेल तर तुम्हाला एक ठराविक वेळ ठरवून घ्यावी लागेल. ६ महिने किंवा वर्षभरात तुम्ही इतर तरुण खेळाडूंना संधी देऊन त्यांना तपासू शकता असंही द्रविड म्हणाला.

शुक्रवारपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होतेय. यावेळी भारतीय संघ व्यवस्थापन तरुण खेळाडूंना अंतिम संघात स्थान देईल अशी आशा राहुल द्रविडने व्यक्त केली आहे. जर आता तुम्ही तरुणांना संधी दिली नाहीत तर ऐनवेळा तुमच्याकडे कोणतेही पर्याय नसता आणि तुम्हाला आहे त्याच खेळाडूंना संधी द्यावी लागते.

याचसोबत सपाट खेळपट्ट्यांवर अश्विन आणि जाडेजा ही फिरकीची जोडगोळी वापरण्याबद्दल विचार करणं गरजेचं असल्याचं द्रविडने म्हणलंय. अशा खेळपट्ट्यांवर विकेट काढणं हे खरचं जिकरीचं काम असतं, सध्याचा इतिहास पाहता सपाट खेळपट्ट्यावर अश्विन आणि जाडेजा विकेट काढू शकत नाहीयेत. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवून देण्यासाठी दुसरे पर्याय शोधण्याची गरज असल्याचंही द्रविडने स्पष्ट केलंय.

राहुल द्रविडकडे भारताच्या युवा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राहुल द्रविडच्या सल्ल्यांकडे भारतीय संघ व्यवस्थापन कसं लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.