ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवनं हॅटट्रिक घेतली. भारताकडून एकदिवसीय सामन्यात असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. त्याच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५० धावांनी पराभूत केलं. या सामन्यातील ३३ व्या षटकात कुलदीपनं हॅटट्रिक घेतली. पहिल्या सामन्यात प्रत्येक चेंडूवर मार्गदर्शन करणाऱ्या धोनीचा त्याच्या हॅटट्रिकमध्ये मोलाचा वाटा आहे. सामन्यानंतर खुद्द कुलदीपनं धोनीला श्रेय देत त्याचे आभारही मानले.
कुलदीपनं ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक आणि फलंदाज मॅथ्यू वेडला पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने वेडला क्लिन बोल्ड केल. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात आलेल्या अॅश्टन अॅगरला पायचित करत कुलदीप हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचला. लागोपाठ दोन विकेट्स घेतल्यानंतर मैदानावर उपस्थित प्रेक्षक त्याची हॅटट्रिक पाहण्यासाठी आतुर झाले. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करुन क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचण्यासाठी कुलदीपनं धोनीचा सल्ला घेणं महत्त्वाच वाटलं. त्यामुळे दोन गडी मिळवल्यानंतर तिसरा बळी मिळवण्यासाठी कसा चेंडू टाकायला हवा, असा सल्ला त्याने धोनीकडे मागितला. धोनीनं त्याला अमूल्य सल्ला तर दिलाचं, पण पॅट कमिन्सचा सुरेख झेल पकडत त्याच्या हॅटट्रिकला हातभारही लावला.
कुलदीप सामन्यानंतर हॅटट्रिकबद्दल म्हणाला की, मैदानावर हॅटट्रिक करण्याचे स्वप्न मी कधीच पाहिले नव्हते. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात मला खूप संघर्ष करावा लागला. पहिल्या सामन्यात मॅक्सवेलनं लगावलेल्या सलग तीन षटकारामुळे खूप काही शिकवलं. हॅटट्रिकचा चेंडू टाकण्यापूर्वी मी धोनीकडे सल्ला मागितला. यावेळी धोनीनं तुला योग्य वाटेल तशीच गोलंदाजी कर, असे सांगितले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनीच्या मार्गदर्शनामुळे कुलदीपनं दोन बळी मिळवले होते. या सामन्यात त्यानं सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांना तंबूचा रस्ता दाखवला होता.