भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील संघर्ष रांची कसोटीत पाहायला मिळाला. ग्लेन मॅक्सवेलने भर मैदानात विराट कोहलीच्या दुखापतीची नक्कल करून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी चौकार अडवण्याच्या प्रयत्नात विराटच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर कोहलीला तातडीने मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर दुसऱया दिवशी कोहली क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकला नाही. विराटची दुखापत काळजी करण्यासारखी नसून तो फलंदाजी करू शकतो, असे संघ व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला होता. भारताच्या फलंदाजीवेळी कोहली आपल्या नेहमीच्या क्रमवारीनेच फलंदाजीला मैदानात आला. पण यावेळी कोहली आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. कमिन्सच्या गोलंदाजीवर विराट अवघ्या ६ धावांवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ करवी झेलबाद झाला.
तत्पूर्वी विराट मैदानात फलंदाजी करत असताना डीप मिड विकेटवर ग्लेन मॅक्सवेलने धावत जाऊन चौकार अडवला. त्यानंतर उठल्यावर मॅक्सवेलने आपला खांदा पकडून विराटची नक्कल केली. चौकार अडवताना घेतलेल्या झेपेमुळे कोहली उजव्या खांद्यावर आदळला होता. त्यावेळी वेदनांनी कळवळणाऱया कोहलीने आपला उजवा खांदा दाबून धरला होता. मॅक्सवेलने त्याचीच नक्कल करून विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर कोहली बाद झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सेलिब्रेशन करताना आपला उजवा खांदा पकडून विराटला डिवचले. कोहलीने कोणतीही प्रतिक्रया न देताना मैदाना सोडणे पसंत केले.