मांडीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी मैदानाबाहेर गेलेले मागील चार महिने हे रोहित शर्मासाठी वेदनादायी होते. मात्र मधल्या फळीतील स्थानासाठी अजिंक्य रहाणे आणि करुण नायर यांच्याशी आपली आता स्पर्धा असेल, या वास्तवाने कधीच झोप उडाली नाही. माझी स्पर्धा ही स्वत:शीच आहे, अशी प्रांजळ कबुली भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या रोहितने दिली.
‘‘माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत मी कधीच मला कुणाशी स्पर्धा करायची आहे, याचा विचार करण्यात वेळ दवडला नाही. तुमची विचारप्रणाली जर अशी असेल, तर खेळाडू म्हणून तुम्ही कधीच विकसित होऊ शकणार नाही. माझी स्पर्धा ही स्वत:शीच आहे. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाही, त्याचा विचार करण्यासाठी वेळ घालवायला मला अजिबात आवडत नाही. मात्र भारत खेळत असलेला एकही सामना चुकवायला मला आवडत नाही,’’ असे रोहितने सांगितले.
दुखापतीच्या कालखंडाविषयी रोहित म्हणाला, ‘‘परिस्थितीशी सामोरे जाण्याचे मानसिक धर्य माझ्याकडे आहे. परंतु जेव्हा शस्त्रक्रिया करावी लागते, तेव्हा त्याआधी काही प्राथमिक भीतीसुद्धा असते. मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुनर्वसन प्रक्रियेचा कार्यक्रम माझ्या अमेरिकेतील डॉक्टरांनी व्यवस्थितपणे तयार केला. साडेतीन ते चार महिन्यांत मी खेळण्यासाठी तंदुरुस्त होईन, अशी ती योजना होती. मात्र तुम्ही सर्वात जास्त ज्या गोष्टीवर प्रेम करता, ते तुम्हाला मिळत नसते, तो काळ अतिशय दु:खद असतो.’’
रोहितला भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या दृष्टीने सामन्यातील तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. त्या दृष्टीने चेन्नईत ४ मार्चला आंध्र प्रदेश आणि ६ मार्चला गोवा यांच्याविरुद्ध होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पध्रेतील सामन्यांत तो मुंबईकडून खेळणार आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत खेळायला मला नक्की आवडेल. मात्र हजारे करंडक स्पध्रेतील हे सामने माझा आत्मविश्वास तपासतील. यासंदर्भात मी सरावतज्ज्ञ आणि फिजिओ यांना कळवले आहे.’’
‘‘मी १०० टक्के तंदुरुस्त असल्याची मला खात्री आहे. मात्र मैदानावर काही चेंडू फटकावल्यानंतरच ते सिद्ध होऊ शकेल,’’ असे रोहितने सांगितले. त्याने मागील तीन कसोटी डावांमध्ये अनुक्रमे नाबाद ६८, ८२ आणि नाबाद ५१ धावा केल्या आहेत.
बेंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहितने एक दिवस आड लाल आणि पांढऱ्या चेंडूने सराव केला. याबाबत तो म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी हे आव्हान नक्की सोपे नसते की, जेव्हा राष्ट्रीय संघ लाल चेंडूसह खेळतो आहे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पांढऱ्या चेंडूसह हंगाम सुरू आहे. दोन्ही क्रिकेटमध्ये वेगळी मानसिकता आणि तंत्र वापरावे लागते.’’
स्टार्कचे अस्त्र प्रभावी ठरणे ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचे -मिचेल मार्श
बंगळूरु : वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे अस्त्र भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरते आहे, हे ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचे आहे, अशी प्रतिक्रिया अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने व्यक्त केली.
पहिल्या सामन्यात स्टार्कने आपली भूमिका चोख बजावताना फॉर्मात असलेले फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना लवकर बाद करण्याची किमया साधली होती. याबाबत मार्श म्हणाला, ‘‘स्टार्क प्रभावी ठरतो आहे, हे ऑस्ट्रेलियासाठी आशादायी आहे. तो जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. भारतात सर्वत्र फक्त फिरकीच यशस्वी ठरते, तिथे स्टार्क आमचे प्रमुख अस्त्र आहे.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘पुण्याच्या खेळपट्टीने आमचे बरेचसे काम सोपे केले होते. रीव्हर्स स्विंग आमच्यासाठी उपयुक्त ठरला. स्टार्क व हॅझलवूड यांची गोलंदाजी किफायतशीर ठरली.’’