भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर संघातील खेळाडूंना आजवर अनेकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) लाखोंची बक्षिसे जाहीर केली आहेत. मात्र यंदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ‘बीसीसीआय’चे हात बांधले गेले आहेत. न्यूझीलंडसोबतच इंग्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाला बीसीसीआयने कोणतेही वैयक्तिक बक्षिस जाहीर केलेले नाही.

वाचा: खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाल्यास अनुराग ठाकूर यांना तुरूंगवास, सुप्रीम कोर्टाने फटकारले

लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्याची जोपर्यंत बीसीसीआय तयारी दाखवत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर बंधने लादली आहेत. भारतीय संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४-० अशी जिंकून ऐतिहासिक विजय साजरा केला. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मिळवलेला हा सर्वात मोठा मालिका विजय ठरला. याआधी भारतीय संघाने विजयी कामगिरी केल्यानंतर बीसीसीआयने संघातील खेळाडूंना लाखभर रुपयांची बक्षिसी जाहीर केली आहेत. पण यावेळी संघातील खेळाडूंना बक्षिसं देण्यासाठी बीसीसीआयला सुप्रीम कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे. लोढा समिती आणि बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या वादाची पुढील सुनावणी ३ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे ३ जानेवारीपर्यंत तरी खेळाडूंना कोणतेही बक्षिस जाहीर होण्याची शक्यता नाही. बीसीसीआयने याआधी २०१५ साली कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने दक्षिण आफ्रिकेला ३-० अशी मात दिल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूला २ कोटींचे इनाम जाहीर केले होते.

वाचा: लोढा समिती भेटायला वेळच देत नाही- अनुराग ठाकूर

 

दरम्यान, लोढा समितीच्या काही शिफारशी बीसीसीआयला रुचलेल्या नाहीत. ‘लोढा समितीच्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवले आहे. पण काही शिफारशींची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे फारच कठीण दिसत आहे. त्यासाठी आम्ही लोढा समितीकडे बैठकीसाठी वेळ मागितला होता, पण गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही,’ असे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.