उमेशचा भेदक मारा; दुसऱ्या दिवसअखेर भारत बिनबाद ४३

उमेश यादवच्या (३/७६) भेदक गोलंदाजीनंतरही भारतीय संघ पहिल्या डावात पिछाडीवर पडला. मात्र रोहित शर्मा (खेळत आहे २०) आणि के. एल. राहुल (खेळत आहे २२) यांनी दुसऱ्या डावात उत्तम सुरुवात करून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय चाहत्यांना दिलासा दिला.

ओव्हल येथे सुरू असलेल्या या लढतीतील दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात बिनबाद ४३ धावांपर्यंत मजल मारली असून ते अद्याप ५६ धावांनी पिछाडीवर आहेत. पहिल्या डावात ९९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतरही रोहित आणि राहुल यांनी नैसर्गिक खेळ केल्यामुळे तिसऱ्या दिवशी सामना कोणाच्या दिशेने झुकतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तत्पूर्वी, आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर ऑली पोप (८१) आणि ख्रिस वोक्स (५०) यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या. गुरुवारच्या ३ बाद ५३ धावांवरून पुढे खेळताना उमेशने दिवसातील पहिल्या पाच षटकांतच क्रेग ओव्हर्टन (१) आणि डेव्हिड मलान (३१) यांना बाद केले. उमेशनेच गुरुवारी धोकादायक जो रूटचा २१ धावांवर त्रिफळा उडवला होता. परंतु ५ बाद ६२ धावांवरून पोप आणि जॉनी बेअरस्टो (३७) यांनी सहाव्या गडय़ासाठी ८९, तर पोप आणि मोईन अली (३५) यांनी सातव्या गडय़ासाठी ७१ धावांची भागीदारी रचून २०० धावांचा पल्ला गाठला. मोहम्मद सिराजने बेअरस्टोला, तर रवींद्र जडेजाने अलीला माघारी पाठवले.

अखेरच्या सत्रात कारकीर्दीतील दुसऱ्या शतकाच्या दिशेने कूच करणाऱ्या पोपचा शार्दूल ठाकूरने त्रिफळा उडवला. वोक्सने मात्र ११ चौकारांसह अर्धशतक झळकावून संघाला पहिल्या डावात बहुमूल्य आघाडी मिळवून दिली. जसप्रीत बुमराने वोक्सला धावचीत करून इंग्लंडचा डाव गुंडाळला. भारताकडून उमेशने तीन, तर बुमरा, जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : १९१

’ इंग्लंड (पहिला डाव) : ८४ षटकांत सर्व बाद २९० (ऑली पोप ८१, ख्रिस वोक्स ५०; उमेश यादव ३/७६)

’ भारत (दुसरा डाव) : १६ षटकांत बिनबाद ४३ (रोहित शर्मा खेळत आहे २०, के. एल. राहुल खेळत आहे २२)