अपराजित मालिका कायम राखणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाची जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी टप्प्यात मंगळवारी नेदरलँड्सविरुद्ध खरी कसोटी लागणार आहे. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या मोठय़ा विजयानंतर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सला पराभूत करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे. ही लढत ‘ब’ गटातील अव्वल स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची असल्याने दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे आणि ‘ब’ गटात तीन विजयांसह त्यांनी (९ गुण) अव्वल स्थान पटकावले आहे, परंतु नेदरलँड्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा गटातील हा अखेरचा सामना असून नेदरलँड्सला आणखी एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे त्यांना अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी आहे. मात्र भारताने येथे विजय मिळवल्यास गोल सरासरीच्या जोरावर ते अव्वल स्थानी कायम राहतील.

भारताने स्कॉटलंड (४-१), कॅनडा (३-०) आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (७-१) यांच्यावर एकहाती वर्चस्व गाजवत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने या विजयाचे श्रेय पेनल्टी कॉर्नरमधील यशाला दिले आहे. तो म्हणाला, ‘‘येथे दाखल होण्यापूर्वी जर्मनीत तीन देशांच्या स्पध्रेत आम्हाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने अपयश येत होते. ती आमची कमकुवत बाजू झाली होती, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत आम्ही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश मिळवले आणि कमकुवत बाजूवर मात केली. संघातील खेळाडू झटपट सुधारणा करत आहेत. नेदरलँड्सविरुद्ध सातत्यपूर्ण खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

दुसरीकडे नेदरलँड्सने पाकिस्तान (४-०), स्कॉटलंड (३-०) यांच्यावर मात केली आहे आणि भारताविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी तेही सज्ज आहेत. असे असले तरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. ‘‘संघाच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर मी समाधानी आहे, परंतु आमचे काम अजून संपलेले नाही. आम्हाला अपराजित्व कायम राखायचे आहे. त्यासाठी सातत्याने आक्रमक खेळ व रणनीतीची १०० टक्के अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. नेदरलँड्सचीही स्पध्रेतील कामगिरी चांगली झालेली आहे,’’ असे ओल्टमन्स म्हणाले.

  • सामन्याची वेळ : सायंकाळी ६.३० वाजल्यापासून.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ व हॉटस्टार अ‍ॅप.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs netherlands world hockey league indian hockey
First published on: 20-06-2017 at 04:32 IST