विश्वचषकातील तिसरा सामना आज न्यूझीलंडशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित असलेले संघ म्हणजे भारत आणि न्यूझीलंड. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शिखर धवनच्या डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो किमान तीन सामने खेळू शकणार नाही. त्याचबरोबर ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयरथ पाऊस रोखणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघांना हरवून विजयी घोडदौड कायम राखली आहे, तर न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दुबळ्या संघांचे आव्हान परतवून लावले आहे. भारताच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले तर धवनने दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी साकारली. या दोन्ही सामन्यांत विराट कोहली आणि हार्दिक पंडय़ा यांनी उपयुक्त योगदान दिले. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला सर्वाधिक धोका आहे तो वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा. सराव सामन्यात बोल्टच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची १७९ धावांवर दाणादाण उडाली होती.

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व राखले असून केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील किवींचा संघ त्यात सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र धवनच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आता वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. लोकेश राहुलला सलामीला उतरवून विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. शंकरची अष्टपैलू कामगिरी आणि कार्तिकचा अनुभव यापैकी शंकरचे पारडे जड आहे.

रोहितवर भिस्त

धवन आणि रोहित शर्मा यांच्यातील सलामीची जोडी ४६८१ धावांनंतर तुटल्यानंतर आता राहुलच्या साथीने रोहितला खेळावे लागणार आहे. परिस्थितीनुसार खेळ करीत रोहितने पहिल्या सामन्यात शतक आणि त्यानंतर अर्धशतक झळकावले होते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहितलाच अधिक जबाबदारीने भारताच्या डावाची सुरुवात करावी लागणार आहे. कमीत कमी धोके पत्करून त्याला भारतीय डावाला आकार द्यावा लागणार आहे.

बोल्टसह लॉकी फर्ग्युसनवर सर्वाच्या नजरा

ट्रेंट बोल्टने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीसमोर शरणागती पत्करण्यास भाग पाडले असले तरी न्यूझीलंडचा ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करणारा लॉकी फर्ग्युसनही सध्या चांगल्या बहरात आहे. वेगवान गोलंदाजीला साथ मिळणाऱ्या ट्रेंट ब्रिजच्या खेळपट्टीवर आपला जलवा दाखवण्यासाठी तोसुद्धा सज्ज झाला आहे. ‘‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ट्रेंट ब्रिजच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली उसळी मिळत होती. आता याच आव्हानाचा फायदा उठवण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे फर्ग्युसनने सांगितले.

पंत इंग्लंडमध्ये दाखल

नॉटिंगहॅम : सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यामुळे गरज पडल्यास त्याच्या जागी भारतीय संघात समावेश करण्यासाठी युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला इंग्लंडला पाठवण्यात आले आहे. धवन पूर्णपणे माघार घेत नाही, तोपर्यंत पंतला सामन्याच्या दिवशी संघासोबत राहता येणार नाही.‘‘संघ व्यवस्थापनाच्या विनंतीनुसार, पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली धवन असून त्याच्यावर इंग्लंडमध्येच उपचार सुरू आहेत. पंत हा भारतीय संघाचा भाग असला तरी त्याला ‘आयसीसी’च्या नियमानुसार, सामन्यादरम्यान संघासोबत बसमधून प्रवास करता येणार नाही अथवा संघासोबत ड्रेसिंगरूममध्येही जाता येणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

‘हम परों से नहीं, हौसलों से उडते है..’

नॉटिंगहॅम : डाव्या हाताच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला किमान तीन सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेतील आपल्या आशा अद्यापही कायम आहेत, हे सांगण्यासाठी धवनने समाजमाध्यमांवर टाकलेली प्रेरक कविता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. धवनने  उर्दू कवी डॉ. राहत इंदोरी यांची कविता ‘ट्विटर’वर टाकली आहे. ‘‘कभीं महक की तरह हम गुलों से उडते है, कभी धुंए की तरह पर्बतों से उडते है.. ये कैंचिया हमें उडने से खाक रोकेगी, के हम परों से नहीं.. हौंसलो से उडते है..’’ या कवितेप्रमाणेच धवनने अद्यापही हार मानलेली नाही.

धवनविषयीचा निर्णय १० ते १२ दिवसांत -बांगर

नॉटिंगहॅम : विश्वचषक स्पर्धेतील शिखर धवनच्या उपलब्धतेविषयीचा अंतिम निर्णय येत्या १० ते १२ दिवसांत घेण्यात येईल, असे भारताचे साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले. ‘‘धवन हा भारताचा महत्त्वाचा खेळाडू असून त्याच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या दुखापतीचे नेमके स्वरूप कळण्यासाठी अवधी हवा आहे. येत्या १० ते १२ दिवसांत त्याच्या दुखापतीचे स्वरूप समजल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. धवनसारख्या खेळाडूला लगेच गमावणे योग्य ठरणार नाही,’’ असेही बांगरने सांगितले.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand icc cricket world cup
First published on: 13-06-2019 at 01:39 IST