भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. टी २० मालिका झाल्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यातील टी २० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

IND vs NZ : धवनच्या जागी संघात युवा मुंबईकर खेळाडू

टीम इंडियाचा 2020 मधील पहिला परदेश दौरा हा न्यूझीलंडचा आहे. त्यासाठी जाहीर केलेल्या संघात शिखर धवनचा समावेश करण्यात आला होता. पण शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी टी २० संघात खेळण्यासाठी संजू सॅमसनला BCCI ने हिरवा कंदील दाखवला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी रात्री उशीरा घोषणा करण्यात आली होती. संघात अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केले होते, पण युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळालेले नव्हते. पण शिखर धवनच्या दुखापतीमुळे त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

असा असेल टी २० संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

संजू सॅमसनला अखेर संधी

श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजय मिळवला. त्यापैकी एका सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याला संघातून वगळल्यामुळे नेटकऱ्यांनी BCCI वर टीकेची झोड उठवली होती. अखेर धवनच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे.

धवनची दुखापत

न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याला आता दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. शिखर धवनच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बदली खेळाडूची घोषणा केली आहे.