जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळीत परंपरागत प्रतिस्पर्ध्यामधील लढतीचा अभाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची संकल्पना २०१० मध्ये प्रथम मांडण्यात आली; परंतु दोनदा ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा २०१९-२० या दोन वर्षांच्या कालखंडात या स्पर्धेचे शिवधनुष्य उचलले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत आणि पाकिस्तान हे दोन परंपरागत प्रतिस्पर्धी स्पर्धेच्या साखळीमध्ये एकमेकांशी सामना करू शकणार नाहीत, अशीच योजना आखली आहे. मात्र हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तरच २०२१ मध्ये त्यांचा सामना होऊ शकेल. हा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे.

आयसीसीच्या त्रमासिक बैठकीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील वर्षांपासून ती स्पर्धा प्रत्यक्षात सुरू होणार असून नवीन पद्धतीनुसार हे सर्व सामने होणार आहेत. त्यात कसोटी खेळणारे नऊ देश सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ सहा संघांशी सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यातील तीन सामने मायदेशात, तर उर्वरित तीन सामने प्रतिस्पर्धी देशाच्या भूमीवर खेळणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ २४ महिन्यांत एकूण ३६ सामने खेळणार आहे. केवळ झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि आर्यलड या देशांना या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. दरम्यान, भारताने पाकिस्तानसमवेत २०१५ ते २०२३ दरम्यान सहा मालिका खेळण्याचा सामंजस्य करार करूनही त्याचे पालन केले नाही. त्यामुळे पाकिस्तानने भारतावर आर्थिक नुकसानीचा दावा केला असून हे प्रकरण आयसीसीसमोर आहे.

त्रयस्थ ठिकाण अनिश्चित

भारत आणि पाकिस्तान या देशांचे संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ करीत अंतिम फेरीत आमनेसामने आले तर त्यावरदेखील आयसीसीने तोडगा शोधून ठेवला आहे. त्या परिस्थितीत दोन्ही संघांचा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येईल. मात्र हे त्रयस्थ स्थळ कोणते ते अद्याप निश्चित झालेले नाही.

या नूतन प्रकाराच्या २०२१ पर्यंत रंगणाऱ्या पहिल्या टप्प्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमवेत खेळत नसले तरी निदान २०२१ ते २०२३ या कालावधीत होणाऱ्या पुढील टप्प्यातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हे दोन देश एकमेकांसमवेत खेळतील, याबाबत आम्ही आशावादी असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan cricket
First published on: 28-04-2018 at 01:48 IST