भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम लढत होत आहे. त्याआधीच वातावरण तापलंय. त्यात पाकिस्तानचा माजी खेळाडू आमिर सोहेल यानं पाकिस्तानी संघाच्या क्षमतेवरच शंका उपस्थित करून ‘मॅच फिक्सिंग’चा काळा डाग लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण आणखीनच तापलंय. आमिर सोहेलच्या या वक्तव्यावरून भारताचा फिरकी गोलंदाज हजरभजननं त्याला चांगलंच सुनावलं. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही त्याच्यावर टीका केली आहे.
आमिर सोहेल जे काही म्हणाला, ते चांगले नाही. मला वाटतंय आमिर भाई नशा करुन बसला आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू या नात्यानं त्यानं पाकिस्तानी संघाला पाठिंबा द्यायला हवा. पाकिस्तान संघानं आतापर्यंत चांगला खेळ केला आहे. त्यांनी या स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे, असं हरभजन म्हणाला. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान तो बोलत होता. रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल होणार आहे. यात भारतच जिंकेल, असा ठाम विश्वास आहे. यानंतर पाकिस्तानसोबत आम्ही या विजयाचं सेलिब्रेशन करू, असंही तो म्हणाला.
दरम्यान, आमिर सोहेलच्या या वक्तव्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही नाराजी व्यक्त केली आहे. आमिरच्या या आरोपानंतर बोर्डानं निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानंही आमिर सोहेलवर टीका केली आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून सध्याच्या संघातील खेळाडूंवर टीका झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानी संघातील खेळाड़ूंनी स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, असं गांगुली म्हणाला.
काय म्हणाला होता आमिर?
“सरफराज, तू काहीही कमाल केली नाहीस. कुणीतरी तुम्हाला मॅच जिंकून दिली आहे. तू जास्त हुरळून जाऊ नकोस. काय घडलंय, काय घडतंय हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. सामना कुणी जिंकून दिला हे विचारू नका. ‘दुआ’ आणि ‘अल्ला-ताला’ने सामना जिंकून दिला आहे. सामना जिंकून देण्यात कुणाचा हात आहे, हे मी आता सांगणार नाही. यात तू काही कमाल केली नाहीस, हे सरफराजला सांगण्याची गरज आहे. तुमची पात्रता काय आहे, हे आम्हाला माहित आहे. तोंड बंद ठेवून तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही काही चुकीचं करत असाल तर ती चूक दाखवून देणं हे आमचं काम आहे. तुम्ही चांगलं कराल तर त्याचं कौतुकही आम्ही करू. तुम्ही चांगला खेळ करत आहात आणि तुमच्याकडून काही चूक होत असेल तर त्यावर आम्ही फार काही बोलणार नाही. तुमचं डोकं ठिकाणावर राहू द्या.”