मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे ‘महायुद्ध’ इंग्लंडमधील ओव्हलच्या रणभूमीवर रंगणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल होणार असून त्याआधीच पाकिस्तानच्या संघानं रणभूमीच्या बाहेर आपला ‘माईंड गेम’ सुरू केला आहे. त्यांच्या निशाण्यावर भारताचा सेनापती अर्थात कॅप्टन विराट कोहली असणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ओव्हलच्या मैदानावर पाकिस्तान आणि भारत या दोन संघात रविवारी घनघोर युद्ध होणार यात शंकाच नाही. फायनलआधीच या महायुद्धासाठी वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघात प्रत्यक्ष लढाई सुरू होण्यापूर्वीच मैदानाबाहेरही ‘युद्ध’ सुरू होतं. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू, त्यांचा स्टाफ विरुद्ध संघातील खेळाडूंविरोधात रणनिती आखण्यास सुरुवात करतो. फायनलच्या आदल्या दिवशीच पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद आमिरनं मैदानाबाहेरही कॅप्टन कोहलीवर बाऊन्सर मारला आहे. तर पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकानंही भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. फायनलमध्ये विराट त्यांचं प्रमुख लक्ष्य असणार आहे, असे स्पष्ट संकेत आमिरनं दिले आहेत. भारतीय संघ कॅप्टन विराट कोहलीवर पूर्णपणे अवलंबून असणार आहे. विराटही या फायनलच्या सामन्यात दबावात असेल. कारण त्याच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे, असे आमिरनं म्हटलंय. विराट कोहलीची विकेट ही आमच्यासाठी महत्त्वाची असेल, असेही तो म्हणाला.

दुसरीकडं पाकिस्तानी गोलंदाजीचा प्रशिक्षक अजहर महमूद यानंही भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. यावेळी भारतावर अधिक दबाव आहे. सर्वच जण भारताबद्दलच बोलत आहेत. पण आम्हीही येथे जिंकण्यासाठी आलो आहोत. भारताची बाजू भक्कम मानली जात असली तरी, परिस्थिती बदलू शकते. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तान चांगली कामगिरी करत नसल्याचा आमच्यावरील ठपका आम्हाला पुसायचा आहे. इतिहास बदलू शकतो. आम्ही तो घडवू शकतो, अशी आम्हाला खात्री आहे, असं अजहर म्हणाला.
पाकिस्तानला केवळ कोहलीलाच घाबरून चालणार नाही. शिखर धवन आणि रोहित शर्माही जबरदस्त फार्मात आहेत. याशिवाय युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनी यांनीही आपल्या बॅटींगचा करिश्मा या स्पर्धेत दाखवलाच आहे. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजाही वेळ पडली तर धुवाधार फलंदाजी करू शकतात, असं जाणकारांचं मत आहे.