|| प्रशांत केणी

भारत आणि पाकिस्तान हे नकाशावरील शेजारी. पण शेजार-शेजारची ही स्वतंत्र राष्ट्रे कशी निर्माण झाली याचा इतिहास आणि त्यानंतरची कटुता हा आजही अप्रिय विषय आहे. दोन्ही देशांमधील तणावग्रस्त संबंध, सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका असे ज्वलंत विषय नित्याचेच आहेत. या देशांमधील सीमेचा एक मार्ग हा २२ यार्डामधून जातो, नव्हे क्रिकेट हाच धर्म इथे मोठय़ा प्रमाणात मानला जातो. सध्या भारत-पाकिस्तानमधील द्विराष्ट्रीय मालिकांना राजकीय संबंध बिघडल्यामुळे पूर्णविराम मिळाल्यामुळे त्रयस्थ देशांमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचा पर्याय मात्र शिल्लक राहतो. स्वाभाविकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तसेच प्रक्षेपण वाहिन्या या सामन्याच्या निमित्ताने आपली प्रेक्षकसंख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून या सामन्याचे समीकरण आखतात.

यंदाच्या विश्वचषकातही अपेक्षेप्रमाणेच भारत-पाकिस्तान सामन्यांची उत्कंठा वाढवण्याचे कार्य माध्यमांनी आणि समाजमाध्यमांनी मोठय़ा प्रमाणात केले आहे. धर्मयुद्ध, महायुद्ध, महामुकाबला, परंपरागत प्रतिस्पध्र्याचा संघर्ष, हायव्होल्टेज सामना अशा विशेषणांनी या क्रिकेट दृष्टिकोनातील एका लढतीचे महत्त्व वाढवले आहे. वडिलांचा दिन म्हणजेच फादर्स डे या दिवशी हा दिवस सामन्यासाठी निश्चित केल्यामुळे ‘बाप’ सिद्ध करणाऱ्या जाहिरातींची चर्चा मोठय़ा प्रमाणात आहे. ‘‘पिताजी का करते है? ..कुताई!’’ अशा प्रकारे दोन्ही देशांमधील चाहत्यांच्या कल्पकतेला मोहोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधून सहीसलामत परतलेला भारतीय सैनिक अभिनंदन वर्धमानला केंद्रस्थानी ठेवूनही दोन्ही देशांमध्ये काही चित्रफिती करण्यात आल्या. ‘‘मला माफ  करा, मेजर. मी तुम्हाला हे सांगू शकत नाही.’’ या चित्रफितीला उत्तर म्हणून निघालेल्या चित्रफितीत भारतीय संघ हरला की तोंड लपवण्यासाठी रुमाल भेट म्हणून देणारा मुलगा दाढी करायला बसतो आणि ती झाल्यावर त्याचे रूप अभिनंदनसारखे झालेले असते. ‘‘ये अभिनंदन कट है, हमारे हिरो का स्टाइल!’’ या जाहिराती थिल्लर म्हणाव्यात तर, त्याहून अधिक थिल्लरपणा समाजमाध्यमांवर आहे. पाकिस्तानी खेळाडू मैदानावरच नमाज पढताना ‘पाऊस पडावा’, अशी दुआ मागत असल्याचे एक कल्पित छायाचित्र (मीम) फेसबुक-ट्विटरवर धुमाकूळ घालते आहे. कुठल्याशा चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बदल करून एका ‘मीम’मध्ये खलनायकाच्या वेशात, हातात चाकू घेतलेला मोहम्मद आमिर ‘विराट कोहली किधर है?’ अशा ओळींसह दिसतो. ‘आम्ही जाहिराती करीत नाही, तर शरणागती पत्करायला लावतो’ हेही मीम समाजमाध्यमांवर फैलावते आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा दोन्ही देशांमध्ये एरवीही घरोघरी सामन्याच्या काही दिवस आधीपासून होतच असते, पण यंदा या जाहिरातबाजीच्या आणि समाजमाध्यमी सवाल-जवाबांच्या ज्वराने हद्द गाठली आहे.

भारत-पाकिस्तान विषय आला की भारताची आघाडीची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाला समाजमाध्यमांवर लक्ष्य केले जाते. पण भारत-पाकिस्तान सामन्याच्या पाश्र्वभूमीवर अभिनंदनला त्यात गोवणाऱ्या कल्पनाविलासांवर तिने तोफ डागली आहे. इथे फक्त क्रिकेट आहे, अशी कानउघाडणीसुद्धा तिने केली आहे. विश्वचषकातील ४८ सामन्यांपैकी फक्त एक भारत-पाकिस्तान सामन्यालाच अंतिम सामन्याप्रमाणेच महत्त्व आले आहे, नव्हे येत राहील. या सामन्याकडे आम्ही फक्त एक सामना म्हणून पाहतो. नवा सामना, नवी रणनीती बाकी काहीच नसते. खेळाडूंचा दृष्टिकोन हा असाच असतो, असे स्पष्टीकरण भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.

प्रसिद्ध तत्त्वज्ञ जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी म्हटले होते की, ‘‘क्रिकेट हा खेळ ११ मूर्ख मंडळी खेळतात आणि ११००० मूर्ख लोक पाहतात.’’ क्रिकेट हा भावनिक विषय काही देशांमध्ये झाला आहे. या भावनांना दिशा देण्याचे आणि माथी भडकावण्याचे कार्य हे समाजमाध्यमांवर होताना दिसत आहे. त्यामुळेच सामन्याची उत्कंठा वाढवतानाच जाहिरातबाजी आणि समाजमाध्यमी प्रचाराची हद्द सांभाळायला हवी!

कुरघोडी करणाऱ्या जाहिराती सीमेच्या दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. या सामन्याची आणखी उत्कंठा वाढवण्यासाठी अशा फालतू जाहिरातींची मुळीच आवश्यकता नाही. या सामन्याकडे आधीच सर्वाचे लक्ष वेधले आहे. देवा शप्पथ सांगते, इथे फक्त क्रिकेट आहे. जर यापेक्षा अधिक काही तरी आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा दृष्टिकोन असेल!     – सायना मिर्झा, भारताची टेनिसपटू

सामन्याकडे विशिष्ट पद्धतीने पाहा असे मी चाहत्यांना सांगू शकत नाही. आम्ही व्यावसायिक पद्धतीने सामन्याकडे पाहतो आणि तो सर्वात महत्त्वाचा असतो. खेळताना आम्ही कधीही अतिभावनिक किंवा अतिउत्साहित नसतो. स्वाभाविकपणे खेळाडूंची आणि चाहत्यांची मानसिकता स्वतंत्र असते.    विराट कोहली, भारताचा कर्णधार