भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यावर अजूनही पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोलकात्यात आज संध्याकाळी पाऊस पडू शकतो. असे झाल्यास भारताची विश्वचषकातील वाटचालच धोक्यात येऊ शकते. सुपर १० फेरीतील कोणताही सामना रद्द झाल्यास हा सामना पुन्हा खेळवण्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान यांना प्रत्येकी १-१ गुण विभागून देण्यात येईल. समजा, विलंबामुळे काही षटकांचा खेळ कमी झाला तर त्यामुळे भारताच्या रनरेटवरही परिणाम होऊ शकतो. भारताने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे सामना रद्द होऊन गुणांची अशाप्रकारे विभागणी झाल्यास भारताला उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागण्याचा धोका आहे. न्यूझीलंडचा सध्याचा फॉर्म कायम राहिल्यास त्यांना उपांत्य फेरीत जाण्यास कष्ट पडणार नाहीत. अशावेळी उपांत्य फेरीत जाणार दुसरा संघ कोणता हे निवडण्याची वेळ आल्यास प्रत्येक गुण आणि रनरेट हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे आजचा सामना खेळला जाणे आणि तो जिंकणे या दोन्ही गोष्टी भारतासाठी आवश्यक आहेत.