आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा निर्वाळा; फिरोझशाह कोटलालाही हिरवा कंदील
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशालाला होणार की नाही, याबाबत चर्वितचर्वण होत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या सामन्याबाबत विश्वास दर्शवला आहे. वर्षभरापूर्वीच सामन्याचे ठिकाण ठरवण्यात आले असून त्यामध्ये ऐनवेळी बदल करता येणार नाही, त्याचबरोबर फिरोझशाह कोटला स्टेडियमसंदर्भात काही समस्या असून त्यांचेदेखील योग्य निवारण करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे.
‘‘धरमशाला आणि नवी दिल्ली या दोन ठिकाणांमध्ये काही समस्या आहेत. पण या दोन्ही ठिकाणी सामने खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे सामन्यांच्या ठिकाणांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. वर्षभरापूर्वी सामन्याचे ठिकाण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणांवरील सामने कुठेही हलवण्यात येणार नाहीत,’’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांनी सांगितले.
‘‘विश्वचषकाचे जेथे सामने खेळवले जातील तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची हमी भारत सरकारने दिली आहे. त्यामुळे आम्हाला जास्त चिंता करण्याचे कारण नाही,’’ असे रिचर्ड्सन म्हणाले.
भारत-पाकिस्तान यांच्या क्रिकेट मंडळातील समस्या सोडवण्यासाठीही आयसीसी प्रयत्नशील आहे. या दोन्ही मंडळांच्या अधिकाऱ्यांशी आयसीसी काही दिवसांमध्ये चर्चा करणार आहे.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यामध्ये संवाद घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा विश्वचषक पूर्णपणे सुरक्षेमध्ये संपन्न होईल,’’ असे रिचर्ड्सन म्हणाले.
फिरोझशाह कोटला स्टेडियमसाठी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (डीडीसीए) पालिकेकडून काही परवानग्या अजूनही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या स्टेडियमवर सामना होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. याबाबत रिचर्ड्सन म्हणाले की, ‘‘काही जण याबाबतीत अफवा पसरवत असून अस्थिरता निर्माण करत आहेत, ते थांबवणे आमच्या हातामध्ये नाही. विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने काही जणांना अशा गोष्टी करण्यात फार रस असतो. हे सारे दुर्दैवी आहे. ठरलेल्या ठिकाणी सामने खेळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करत आहोत.’’
या दोन्ही ठिकाणांबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘‘सामन्याची दोन्ही ठिकाणे वर्षभरापूर्वीच ठरवण्यात आली होती. त्यामुळे आता आयसीसी किंवा बीसीसीआय काहीच करू शकत नाही. हिमाचल प्रदेश सरकारने धरमशाला येथील सामन्याला पुरेपूर सुरक्षा पुरवणार असल्याचे उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्याचबरोबर डीडीसीएनेही सर्व गोष्टींची पूर्तता केली असून मंगळवापर्यंत सारे काही आलबेल होईल.’’
सुखविंदर सुखू यांचा अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा
धमरशाला : हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू यांनी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘‘ ऑगस्ट २००५ मध्ये अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानविरुद्ध एक ‘ट्विट’ केले होते. यामध्ये त्यांनी दाऊद कराचीमध्ये असून पाकिस्तानशी खेळताना खरेच शांततेचा विचार करता येऊ शकतो का, त्यांच्याविरुद्ध आपण सामने कसे खेळू शकतो? असे काही प्रश्न उपस्थित केले होते. पण आता कोणत्या मुद्यांमुळे त्यांचे मतपरीवर्तन झाले आहे, हे समजत नाही.
प्रत्येक सामन्यासाठी २५० चाहत्यांना व्हिसा
विश्वचषकातील प्रत्येक सामन्यासाठी २५० पाकिस्तानच्या चाहत्यांना व्हिसा देणार असल्याचे भारताने जाहीर केले आहे. सामन्याचे तिकीट, प्रवासाचे तिकीट आणि राहण्याची सोय, हे सारे पाहूनच व्हिसा देण्यात येणार आहे. ‘‘आतापर्यंत प्रत्येक सामन्यासाठी २५० पाकिस्तानच्या चाहत्यांना व्हिसा देण्याचे आम्ही ठरवले आहे. जर पाकिस्तानचा संघ बाद फेरीत पोहोचला तर व्हिसाच्या संख्येत वाढ करण्यात येऊ शकते,’’ असे गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भारतामध्ये सुरक्षेची समस्या नाही – इंझमाम
ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला योग्य सुरक्षा पुरवण्यात येणार की नाही, याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) साशंक आहे; पण पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकने भारतात खेळताना कधीही असुरक्षित वाटले नाही, भारतामध्ये सुरक्षेची कोणतीही समस्या नाही, असे म्हटले आहे.
तपास पथकाची पोलिसांशी चर्चा
धमरशाला : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या स्टेडियमची पाहणी यावेळी पाकिस्तानच्या द्विसदस्यीय तपास पथकाने केली. पाकिस्तानच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे संचालक उस्मान अन्वर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अधिकारी आजम खान यांचा या पथकामध्ये समावेश आहे. या पथकाने येथील स्थानिक पोलीस वरीष्ठ अधिकाऱ्यांशी सुरक्षेबाबत चर्चा केली. यानंतर हे पथक हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांची भेट घेणार आहे. हे पथक आपला अहवाल पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.
डीडीसीएला पूर्णत्व प्रमाणपत्र
नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला स्टेडियमवर ट्वेन्टी-२० विश्वचषक सामन्याच्या आयोजनावरून निर्माण झालेल्या संभ्रमतेचे वादळ सोमवारी नाहीसे झाले. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने (एसडीएमसी) सोमवारी पूर्णत्व प्रमाणपत्र दिल्याने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचा (डीडीसीए) विश्वचषक सामन्याच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘‘एसडीएमसीकडून डीडीसीएला पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाले आहे,’’ अशी माहिती डीडीसीएचे उपाध्यक्ष सी. के. खन्ना यांनी दिली.