‘फिफा’ क्रमवारीत सुधारणा करण्याचे लक्ष्य; अंधेरी क्रीडासंकुल इतिहासाचा साक्षीदार
युवा भारतासमोर मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात शनिवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन संघटनेतील पोर्तो रिको संघाचे आव्हान आहे. या लढतीसाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य २७ खेळाडूंपैकी १३ खेळाडू २३ वर्षांखालील असल्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव फायद्याचा ठरणार आहे.
या लढतीत विजय मिळवून जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत सुधारणा करण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर असणार आहे. ६१ वर्षांनंतर मुंबईत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळविण्यात येणार असल्यामुळे फुटबॉल चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. १९५५ साली मुंबईत भारत आणि यूएसएसआर यांच्यात सामना खेळविण्यात आला होता.
‘पुढील ६-७ वष्रे भारताचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या खेळाडूंचा संघ तयार करण्यावर आमचा भर आहे. त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यश मिळवले आहे, परंतु यामध्ये अजून सुधारणा होऊ शकते. संघातील प्रत्येक जागेसाठी निकोप स्पर्धा आहे,’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी व्यक्त केले. शनिवारी होणाऱ्या लढतीच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या लढतीत सुनील छेत्री, सुब्राता पॉल़, जेजे लाल्पेखलुआ, अर्नब मोंडल आणि नारायण दास या अनुभवी खेळाडूंना पहिली पसंती असेल, तर गुरप्रीत सिंग संधू संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
कॉन्स्टन्टाइन यांच्या कराराबाबत निर्णय नाही
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांचा करार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे. मार्च २०१७ पासून आशिया चषक स्पध्रेच्या तिसऱ्या पात्रत फेरीला सुरुवात होणार आहे. मात्र, या पात्रता स्पध्रेत भारताचे प्रशिक्षक कोण असतील, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ‘याबाबत अद्याप चर्चा केलेली नाही. सध्या आमचे सर्व लक्ष पोर्तो रिकोविरुद्धच्या लढतीवर आहे,’ असे एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी सांगितले.